प्रवाशांच्या कान-नाकातून रक्त; जेट एअरवेज विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
photo credit: twitter

मुंबईवरून जयपूरला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या जेट एअरवेज विमानमधील क्रू मेंबरच्या चुकीमुळे जवळ जवळ 100 लोकांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या घटनेनंतर विमानाचे पुन्हा मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार हा केबिन क्रू विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच ऑन करण्यास विसरला. त्यामुळे विमानातील हवेचा दाब वाढला आणि प्रवाशांना रक्तदाबाचा त्रास, नाका-कानातून रक्तस्त्राव व डोकेदुखीचा त्रास सुरु झाला.  नक्की वाचा : विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !

गुरुवारी सकाळी 166 लोकांना घेऊन जेट एअरवेजचे विमान मुंबईहून जयपूरला रवाना झाले. मात्र काही वेळातच प्रवाशांच्या नाकातून रक्त वाहू लागले. काही प्रवाशांना रक्तदाबाचा त्रास तर काहींना डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. तपासणी केली असता विमानातील ऑक्सिजन प्रेशर व्यवस्थित सुरू केलं नसल्यानं हा त्रास होत असल्याचे लक्षात आलं. गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमान तातडीने पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आलं. विमानाचे लँडिंग झाल्यावर विमानतळावरच प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान जेट एअरवेजकडून प्रवाशांसाठी काही पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

या प्रकरणाची गंभीर दाखल घेत डीजीसीएकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, आणि विमानतळ प्रशासनाने या केबिन क्रूला निलंबित केलं आहे.