दिवाळी हा आनंदाचा आणि जल्लोषचा सण आहे. दिव्यांची आरास, रोषणाई केल्यानंतर संध्याकाळी फटाके उडवण्याची प्रथा आहे. यंदा प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पुरक फटाके उडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र दिवाळीच्या दिवसात फटाके उडवताना नकळत अपघात होण्याची शक्यता असते. आबालवृद्ध उत्साहाच्या भरात दिवाळीमध्ये फटाके उडवताना काही गोष्टी विसरतात आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगतात. भुईचक्र, पाऊस (अनार), फुलबाज्या उडवताना त्याच्यामधील दारू गोळ्याचा अचानक स्फोट होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर डाग पडण्याची, इंफेक्शन होण्याची शक्यता असते. अशावेळेस फटाके उडवताना काही प्रथमोपचाराच्या टीप्स आणि नियम लक्षात ठेवल्यास मोठा धोका टाळण्यास मदत होऊ शकते.
दिवाळीमध्ये प्रथमोपचारांनी जखमांवर कसे कराल उपाय?
फटाक्यामुळे भाजल्यास ताबडतोब आणि योग्य प्रथमोपचार करणं गरजेचे आहे. दिवाळीच्या सणामध्ये तुमच्या आनंदावर अशा लहान सहान अपघातांमुळे विरजण पडू नये म्हणून या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा.
कोल्ड कॉम्प्रेस/ थंड पाणी
कोरफडीचा गर
कोरफडयुक्त मॉईश्चराईज्ड क्रीम/ लोशन
बॅन्डेज
पेन किलर गोळ्या
लहान सहान जखमांवर प्रथमोपचार कसे कराल?
लहानशा स्वरूपात जखम झाली असेल, भाजलं असेल तर त्यावर घरगुती उपाय फायदेशीर ठरतात पण जकहम मोठी असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान जखमा मोठं स्वरूप घेऊ नयेत किंवा त्यामध्ये इंफेक्शन पसरू नये म्हणून काळजी घेणं आवश्यक आहेत. त्यासाठी काय कराल?
- भाजलेल्या त्वचेचा भागावर तात्काळ कोल्ड प्रेस ठेवा. किंवा तो भाग वाहत्या थंड पाण्याखाली ठेवा.
- जखमेवर तात्काळ मॉईश्चराईज्ड लोशन लावा. यामुळे त्वचा शुष्क होणार नाही. यामुळे भाजल्यानंतर येणारा फोड टाळण्यास मदत होते.
- sterile gauze किंवा बॅन्डेज जखमेवर सैलसर बांधा.
लहान जखमा टाळण्यासाठी आणि हाताळताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?
- फटाके उडवताना दागिने, अंगठ्या, ब्रेसलेट्स घालणं टाळा.
- भाजल्यामुळे अतिशय वेदना होत असतील तरच पेन किलरची मदत घ्या.
- भाजल्यानंतर फोड आल्यास ते फोडण्याचा मोह टाळा. भाजल्यानंतर जखम भरून निघण्यासाठी तो फोड हा मदत करत असतो. त्यामुळे तो फोडू नका, दाबू नका.
- आग पटकन खेचून घेईल असे कापड वापरणं टाळा. घेरदार कपडे टाळा.
- मानेजवळ, कंबरेजवळ ओढण्या, स्कार्फ़्स घेऊन फटाके उडवणं, पळापळ करणं टाळा.
- घरामध्ये प्रथमोपचार पेटी कुठे ठेवलीय याची माहिती घरातील इतर सदस्यांनाही देऊन ठेवा.
दिवाळी हा प्रकाशाचा सण असला तरीही तो साजरा करताना काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. अनेकदा उत्साहाच्या भरात नकळत झालेल्या गोष्टी, अपघात जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे लहान मुलांना एकट्याने फटाके उडवायला पाठवू नका. एखाद्या जबबदार व्यक्तीच्या देखरेखीखालीच फटाके उडवा.