
गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. आता भारतासहित अनेक देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी होत आले आहे. भारताचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. मात्र अनेक रुग्णांमध्ये कोरोनानंतर इतर काही दुष्परिणाम दिसू लागले आहेत. कोरोना विषाणूमुळे कोट्यावधी लोकांनी प्राण गमावले आहेत, परंतु या विषाणूचा पराभव करणारे बरेच लोक एका विलक्षण समस्येचा सामना करीत आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर अनेक लोकांची वास घेण्याची क्षमता प्रभावित झाली आहे. वैद्यकीय भाषेत, त्याला पॅरोसमिया (Parosmia) म्हणतात आणि अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या आवडत्या परफ्युमचा सुगंधही दुर्गंधीसारखा भासतो.
खाद्यपदार्थांची चव आणि वास जाणे हे कोरोना व्हायरसचे एक प्रमुख लक्षण आहे, मात्र दीर्घकाळापर्यंत कोविड-19 ची लक्षणे असणा-या लोकांना पॅरोसमिया नावाच्या आजारामुळे मासे, गंधक इत्यादींच्या तीव्र वासाचा तिटकारा वाटतो. यामुळे वास घेण्याची क्षमता क्षीण होते. ही लक्षणे विशेषत: तरुण लोक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आढळतात. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 मध्ये बरेच लोक काही काळासाठी वास घेण्याची क्षमता गमावतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतर काही रुग्णांची ही क्षमता परत येते मात्र काही लोकांसाठी गोष्टी वेगळ्या ठरतात.
पॅरोसमिया नावाच्या आजारामध्ये ज्या गोष्टींना सुगंध आहे जसे की, साबण, अत्तर यांचा तिरस्कार वाटू लागतो किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी त्याच्या वासामुळे नापसंत वाटू लागतात. पॅरोसमिया अवस्थेची संख्या सतत वाढत आहे, परंतु हे का घडते किंवा कसे बरे करावे याबद्दल शास्त्रज्ञांना माहिती नाही. पॅरोसमियामध्ये वासाची भावना विकृत होते. आपली सुगंधाची तीव्रता कमी होते म्हणजे तुम्ही सभोवतालच्या सुगंधी गोष्टींचा पूर्णपणे वास घेऊ शकत नाही.
डॉक्टरांच्या मते, कोरोना विषाणू पीडित लोकांच्या नाकाचे Receptors Nerve Endings नष्ट करतो. नाकातील उपस्थित मज्जातंतू मेंदूच्या मदतीने कोणत्याही वस्तूची चव शोधतात. मात्र जेव्हा ते खराब होतात तेव्हा ती व्यक्ती पॅरोसमियाला बळी पडते, म्हणजेच त्याची वास आणि चव घेण्याची क्षमता कमी होते.