![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/Coronavirus-380x214-1.jpg)
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु झाला आणि दिवसागणित त्याचा प्रकोप वाढू लागला. जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरस संसर्गाच्या कचाट्यात सापडले आहेत. भारतात मार्च महिन्यापासून सुरु झालेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप थांबलेला नाही. दरम्यान, या संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असते. कोविड-19 (Covid-19) हा न्युमोनिया सारखा आजार आहे. याचा श्वसन प्रक्रीयेवर परिणाम होतो, असे बोलले जात होते. मात्र कोविड-19 संसर्गाचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. ताप, सर्दी, खोकला, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, नाक गळणे, चव, वास न येणे ही सामान्यपणे कोरोना व्हायरसची लक्षणे समजली जातात. परंतु, या व्यतिरिक्तही काही लक्षणे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतात. ताप, खोकल्यापूर्वी ही लक्षणे व्यक्तींमध्ये दिसून येतात.
घसा खवखवणे, थकवा ही कोविड-19 संसर्गाची लक्षणे असतात. परंतु, दर वेळेस हीच लक्षणे दिसून येतील असे नाही. डोकेदुखी, चव, वास न येणे ही लक्षणेही कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये आढळून येतात. काही रुग्णांच्या नर्व्हस सिस्टमवर कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रभाव पडतो. (WHO ने दिला Pandemic Fatigue बाबत सतर्क राहण्याचा इशारा; कोरोना संकटामुळे चिडचिड, अनुत्साही वाटणं या मानसिक आरोग्यावर परिणाम करणार्या समस्यांशी कसा कराल सामना?)
एनल्स ऑफ न्यूरोलॉजीच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये 'डोकेदुखी', 'चक्कर येणे', 'स्ट्रोक्स' आणि 'सतर्कतेची कमतरता' असे चार न्यूरोलॉजिकल लक्षणे देखील दिसून आली आहेत. यापूर्वी सुका खोकला, घसा खवखवणे आणि ताप यांसारखी लक्षणे रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत होती. संशोधकांनुसार, कोरोना बाधित रुग्णांमध्ये चव, वास न येणे, एकाग्र होऊ न शकणे यांसारख्या समस्या दिसून आल्या. तसंच ताप, खोकला होण्यापूर्वी यांसारखी न्यूरोलॉजिकल लक्षणे कोरोना बाधित रुग्णांमध्ये अधिक दिसून येतात, हे या अभ्यासातून समोर आले आहे.
दरम्यान, सध्या भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6757132 वर पोहचला असून त्यापैकी 5744694 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 104555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, सध्या देशात 907883 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.