Bird Flu Outbreak: 'कच्चे दूध पिऊ नका, पुरेशा तापमानात मांसाहार शिजवा', बर्ड फ्लूबाबत केंद्राचा सल्ला
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

Bird Flu Outbreak: गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात बर्ड फ्लूच्या (Bird Flu) रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या गंभीर आजाराबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. केंद्राने राज्यांना सांगितले आहे की, सध्याचे पुरावे असे सूचित करतात की एव्हीयन इन्फ्लूएंझा मानवांपर्यंत पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतो. परंतु या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत बर्ड फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, तसेच खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. अमेरिकेतील सुमारे आठ राज्यांतील संक्रमित गुरांच्या दुधात या विषाणूची पुष्टी झाली आहे. भारतातील केरळ, झारखंड आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही हा संसर्ग आढळून आला आहे.

हा वाढता प्रादुर्भाव पाहता, लोकांना दूध व्यवस्थित उकळून सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्याने विषाणूचा मानवांमध्ये संसर्ग रोखण्यास मदत होईल. केंद्रीय आरोग्य महासंचालक डॉ. अतुल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी इन्फ्लूएंझा संदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीत H5N1 आणि H1N1 या दोन्ही प्रकारच्या इन्फ्लूएंझावर चर्चा झाली.

अमेरिका आणि भारतातील काही भागांमध्ये बर्ड फ्लूच्या प्रसाराबाबत खबरदारी घेत, केंद्र सरकारने लोकांना कच्चे दूध न खाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेशा तापमानात शिजवलेले मांसाहार खाण्याचा सल्ला दिला आहे. कच्च्या दुधाशिवाय बाजारात विकले जाणारे दुग्धजन्य पदार्थ सुरक्षित आहेत. याचे कारण म्हणजे जवळजवळ सर्व (99%) दुग्धजन्य पदार्थ पाश्चराइज्ड आहेत. पाश्चरायझेशन प्रक्रियेत, दूध गरम केले जाते, ज्यामुळे त्यात असलेले बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट होतात. (हेही वाचा: Uttarakhand: डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या धोक्याबाबत आरोग्य विभाग सतर्क, आरोग्य सचिवांनी ॲडव्हायझरी केली जारी)

मात्र कोणत्याही संभाव्य संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य महासंचालकांनी सांगितले आहे. हंगामी आणि एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणूंवरही लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, झारखंडमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरला असून राज्याची राजधानी रांचीमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे आतापर्यंत चार हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.