Health Benefits Of Spicy Food (Photo Credits: Instagram/theroyalmaharajaig)

चमचमीत पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटणार नाही असा व्यक्ती निदान आपल्या देशात तरी सापडणं दुर्मिळच! वेगवेगळ्या भन्नाट मसाल्यांच्या (Spices)  उत्पादनात भारताचं (India)  नाव हे अव्वल देशांच्या यादीत सामील आहे. मात्र अलीकडे तिखट खाण्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात या विचाराने अनेकांनी आपल्या खादाड हौसेला मुरड घालत या पदार्थांकडे पाठ वळवली होती. मात्र एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार संतुलित प्रमाणात तिखट पदार्थाचं सेवन केल्यास त्याचा स्वास्थ्य जपण्यासाठी अधिक फायदा होत असल्याचं समोर आलं आहे.

तिखट खाण्यामुळे शरीराची हानी होत असेल तर त्यामागील मुख्य कारण हे मसाल्यांची भेसळ आहे, नैसर्गिक रित्या तयार केलेल्या मसाल्याचा जेवणात मर्यादित प्रमाणात वापर केल्यास हे तिखट अन्न अनेक शारीरिक व्याधींवर एक गुणकारी औषध म्हणून सिद्ध झालं आहे.तिखट पदार्थांमुळे जेवणातील मिठाच्या सेवनावर बंधन येते परिणामी उच्च रक्तदाब (High Blood Pressure) या सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते,असं तज्ञ् सांगतात. पाणीपुरी खाण्याचे हे आहेत आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

चला तर मग बघूयात भारतीय मसाल्यांनी बनलेल्या चमचमीत खाण्याने शरीराला होणारे फायदे...

1)वजन कमी करते लाल मिरची

वैद्यकीय अभ्यासानुसार लाल मिरचीत असणाऱ्या कैप्साइसिन मुळे शरीरातील अनावश्यक चरबी घटण्यास मदत होते. कैप्साइसिन हे नैसर्गिक रसायन पचनप्रक्रिया जलद करून कमी वेळात कॅलरीज घटवतं. शिवाय लाल मिरचीच्या सेवनाने वारंवार भूक लागण्याचे प्रमाण देखील कमी होते, मात्र वजन घटवण्यासाठी स्वस्थ आहारासोबत या पर्यायाचा संतुलित वापर करावा, असेही तज्ञ सुचवतात.

2)हृदय होते स्वस्थ

मर्यादित प्रमाणात मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हार्ट एटॅक, हार्ट स्ट्रोक यांसारख्या हृदय संबंधित व्याधी कमी प्रमाणात आढळतात असं सर्वेक्षणात समोर आलं आहे. साधारण सर्वच भारतीय मसाले गरम स्वरूपाचे असतात त्यामुळे शरीरातील अनावश्यक कोलेस्ट्रॉल निघून जायला मदत होते.त्यामुळे तुमच्या हृदयाला स्वस्थ ठेवायचे असल्यास तुमच्या आहारात तिखट पदार्थांना नक्की सामील करू शकता.

3)रक्तदाब सुधारायला मदत

उग्र वासाच्या व तीव्र स्वादाच्या भारतीय मसाल्यांमध्ये व्हिटॅमिन A तसेच व्हिटॅमिन C ची मात्र अधिक आढळते. या व्हिटॅमिनमुळे हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारायला मदत होते. तेव्हा रक्तदाब सुरळीत करण्यासाठी हे मसाले नक्कीच फायदेशीर आहेत असे म्हणता येईल.

4)पचनक्रिया सुरळीत होते

तिखट जेवणाने ऍसिडिटीचे प्रमाण वाढून पाचनक्रियेत अडथळा येतो असे मत अनेकजण मदत असले तरी, प्रत्यक्ष निरीक्षणात या पदार्थांमुळे पचन सुरळीत होत असल्याचे दिसून आले आहे. मसालेदार पदार्थांमुळे शरीरात हाइड्रोक्लोरिक ऍसिडची निर्मिती होते ज्यामुळे पचनप्रक्रिया जळत होते.याशिवाय मसाल्यांमधील कैप्सैसिन पोटातील अल्सरचे जंतू मारून टाकण्यातही मदत करते.

5)निद्रानाशावर उपाय

तिखट पदार्थांच्या सेवनाने झोपेच्या पॅटर्नमध्ये बराच सुधार होत असून चांगली झोप लागते असे काही अभ्यासकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे तुम्हालाही निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तिखट पदार्थांना जेवणात एकदा स्थान देऊन तपासायला हरकत नाही.

भारतीय मसाल्यांना आयुर्वेदातही महत्वाचं स्थान प्राप्त आहे. या मसाल्यांच्या गुणकारी परिणामासाठी संतुलित वापर आवश्यक आहे अन्यथा यामुळे स्वास्थावर उलट परिणाम होऊ शकतात.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.