प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Maxpixel)

Air Pollution and Mental Health: दिल्लीतील (Delhi) वायू प्रदूषणाचा (Air Pollution) मानसिक आरोग्यावर (Mental Health) परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांची दुःखाची भावना वाढीस लागत आहे, त्यांना अभ्यासाशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत, गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होत आहे आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमताही कमी होत आहे. दिल्ली सरकारने याबाबतचा अहवाल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (NGT) सादर केला आहे. यापूर्वी, न्यायाधिकरणाने राजधानीतील हवेच्या गुणवत्तेतील बिघाडाच्या 'मानसिक पैलू'चे विश्लेषण करण्याच्या आवश्यकतेवर, दिल्ली सरकार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह (CPCB) विविध प्राधिकरणांकडून उत्तर मागवले होते.

एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने सांगितले की, वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करणाऱ्या विविध अभ्यासांचा विचार करून दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने उत्तर दाखल केले आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि तज्ज्ञ सदस्य ए सेंथिल वेल यांचा न्यायिक सदस्य म्हणून समावेश आहे. सर्वांनी या अहवालाचा विचार केला आणि म्हटले की, वायू प्रदूषणामुळे भारतात मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे पुरावे आहेत.

आरोग्य विभागाच्या अहवालात असेही म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे लोकांचा मानसिक त्रास वाढला आहे, विशेषत: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकसंख्येमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून आल्या आहेत. अहवालाचा हवाला देत खंडपीठाने म्हटले आहे की, पर्यावरणीय प्रदूषक, विशेषत: वायू प्रदूषक हे चिंता, मूड बदलणे, मानसिक समस्यांसह मानसिक आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. वेगवेगळ्या लोकांवर त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. (हेही वाचा: Couples Who Drink Together May Live Longer: 'जी जोडपी एकत्र मद्यपान करतात ते अधिक आनंदी-निरोगी राहतात व दीर्घ आयुष्य जगतात'; अभ्यासात मोठा खुलासा)

एनजीटी पॅनेलने सांगितले की, दिल्ली सरकारच्या अहवालात रुग्णालयांद्वारे प्रदान केलेल्या मानसिक आरोग्य सेवांचा वापर करण्याव्यतिरिक्त सक्रिय राहणे आणि थेरपिस्टशी बोलणे यांसारखे उपाय सुचवले आहेत. दरम्यान, सीपीसीबीच्या उत्तराची दखल घेत न्यायाधिकरणाने सांगितले की, अमोनिया, शिसे, निकेल, आर्सेनिक आणि बेंजो (ए) पायरीनसह काही वायू प्रदूषकांचे परीक्षण केले जात नाही. परिणामी वायू प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. एनजीटी 10 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.