दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक रुग्णालयाने दावा केला आहे की, कोविड-19 (Coronavirus) विरूद्ध रोगप्रतिकारक बूस्टर म्हणून च्यवनप्राशवरील (Chyawanprash) अभ्यासामध्ये 'उत्साहवर्धक निकाल' मिळाले आहेत. भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठे रुग्णालय, चौधरी ब्रह्म प्रकाश आयुर्वेद चरक संस्थेतील (Chaudhary Brahm Prakash Ayurved Charak Sansthan) आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवरील चार महिन्यांच्या अभ्यासानंतर, असे सूचित केले गेले आहे की च्यवनप्राशचा नियमित वापर केल्यास एखाद्या व्यक्तीला कोविड-19 च्या गंभीर संसर्गापासून वाचवता येऊ शकते. हा अभ्यास गेल्या वर्षी मे मध्ये 200 कोविड-19 नकारात्मक आरोग्य कर्मचार्यांवर सुरु केला होता.
अभ्यासामध्ये सामील गटास दररोज दोन वेळा 12 ग्रॅम च्यवनप्राश, सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्याच्या किमान एक तासापूर्वी आणि रात्री गरम पाण्यात रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी दिला गेला. यादरम्यान कंट्रोल ग्रुपने जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवा कामगारांसाठी पारंपारिक मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. अभ्यासाच्या कालावधीनंतर म्हणजेच 30 व्या दिवशी कोणत्याही गटात कोविड-19 ची लक्षणे आढळली नाहीत. च्यवनप्राशला संभाव्य सावधगिरीचा उपाय म्हणून तसेच सुरक्षित रोगप्रतिबंधक औषध म्हणून ते वापरले जावे, हा या अभ्यासाचा उद्देश होता. कोरोना व्हायरसशी निगडीत सरकारी संचालित संस्थेमार्फत च्यवनप्राशच्या फायद्यांबद्दलचा हा कदाचित पहिला अभ्यास आहे.
दरम्यान, डाबर, बैद्यनाथ, झंडू इ. सारख्या सर्व मोठ्या च्यवनप्राश कंपन्यांनी आयुर्वेदिक किंवा अॅलोपॅथीक रुग्णालयांशी हातमिळवणी केली आहे. कोविड-19 च्या विरोधात त्यांची उत्पादने प्रतिरक्षा वाढविणारे आहेत हे सिद्ध करण्यासाठी प्रायोजित क्लिनिकल चाचण्या घेतल्या. जानेवारी 2021 मध्ये, झंडू च्यवनप्राश ब्रँडचे मालक, इमामी लिमिटेडने आपल्या ब्रँडच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी, निरोगी व्यक्तींवर अभ्यास करण्याच्या उद्देशाने देशाच्या क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्रीमध्ये नोंदणी केली. देशातील 5 केंद्रांवर हा अभ्यास केला जाईल. (हेही वाचा: कोरोना गायत्री मंत्रामुळे ठिक होतो? केंद्र सरकारच्या मदतीने AIIMS ऋषिकेश करतायत रिसर्च)
डाबर इंडिया लिमिटेडने, कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘डाबर च्यवनप्राश’ या उत्पादनासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात असाच अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासाला सकारात्मक परिणाम दिसून आले असा दावा कंपनीने केला आहे.