कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनच्या (Lockdown) काळात अनेकांनी आपल्यातील छुप्या शेफला जागे केले आहे. अशा वेळी तुमच्या मदतीसाठी आम्ही काही किचन टिप्स घेऊन आलो आहोत. बहुतांश पदार्थांमधील एक सामान्य घटक असतो कांदा (Onion). कांद्यामुळे नेमकी कोणती चव येते माहीत नाही पण कांदा हे पदार्थात जान आणतो हे मात्र नक्की! पदार्थाचे प्रमाण वाढवण्यास, पदार्थाला गरजेनुसार कुरकुररीत किंवा मऊ बनवण्यात याची मदत होते. कांद्याचे कितीही फायदे असले तरी एक गोष्ट मात्र नेहमीच डोकेदुखी ठरते ती म्हणजे कांदा चिरणे. कांद्याच्या उग्रतेमुळे कांदा चिरताना डोळे झोंबायला लागतात, त्यातून पाणी येते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काळजी करू नका आज आपण अशा काही सोप्प्या ट्रिक्स (Onion Cutting Hacks) पाहणार आहोत ज्यामुळे ही समस्या चटकन दूर होईल. वर्षानुवर्षे अनेक गृहिणी या टिप्स फॉलो करतात त्यामुळे याचा प्रभाव किती पडेल हे आम्ही सांगायची गरज नाही तुम्ही स्वतःच तपासून पहा..
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय करावे?
- एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि कांदा कापताना ते भांडं तुमच्या कांद्याजवळ ठेवा.गरम पाणी हे कांद्यातून निघणारा दर्प नष्ट करते. कांदा पाण्यात बुडवून घेतल्यासही फरक जाणवतो.
- पाण्यात कांदा भिजवल्याने यातील अॅसिडिक एन्जाईम निघून जाण्यास मदत होते. जर का तुम्हाला वेळ असेल तर चिरण्याच्या काही वेळ आधी कांदा साल सोलून थंड पाण्यात किंवा फ्रीज मध्ये ठेवावा.
- कांदा चिरताना त्याचा एक जाडसर पापुद्रा डोक्यावर ठेवावा.
- कांदा कापण्यापूर्वी तो वाहत्या पाण्याखाली धरुन ठेवा म्हणजे कापताना डोळे चुरुचुरणार नाही आणि पाणी सुद्धा येणार नाहीत.
- एक प्रयोग करून पाहायचा असल्यास कांदा चिरताना काहीतरी चघळत राहा जेणेकरून तुम्ही श्वास घेताना कांद्याचा दर्प थेट आत जाणार नाही.
कांद्यामध्ये अनेक गंधसंयुक्ते संयुगे आणि एन्झाइम असतात. जोपर्यंत आपण कांदा चिरत नाही तोपर्यंत या एन्झाईम्सचा हवेशी संपर्क येत नाही. एकदा का हे घटक हवेच्या संपर्कात आले की ते पसरू लागतात आणि त्याच्या उग्र दर्पाने डोळ्यातून पाणी येते. जेव्हा आपण कांदा धुवून किंवा थंड करून चिरतो तेव्हा पाण्याच्या अंशाने हे एंझाइम निघून गेलेले असतात त्यामुळे त्रास कमी होतो.