
एप्रिल 2025 मध्ये घरगुती थाळीच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी 4% ची घट झाली असून, यामागील प्रमुख कारण म्हणजे भाज्यांच्या किंमती कमी होणे, असे क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स (CRISIL MI&A) च्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘रोटी राइस रेट’ (RRR) या मासिक अहवालात देशातील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील प्रचलित इनपुट किमतींवर आधारे घरगुती थाळीच्या खर्चाचा आढावा घेतला जातो. या अहवालानुसार, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमती कमी झाल्या असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या अन्न खर्चावर सकारात्मक परिणाम झाला आहे. विशेषतः कांदा, बटाटे आणि टोमॅटो यांच्या किंमती कमी झाल्याने शाकाहारी थाळी स्वस्त झाली, तर मांसाहारी थाळीच्या किंमती कमी होण्यास ब्रॉयलर कोंबडीच्या किंमतीतील घसरण कारणीभूत ठरली.
थाळीच्या किंमतीत घट का झाली?
क्रिसिलच्या अहवालानुसार, महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर, शाकाहारी थाळीच्या किमती 1% ने कमी झाल्या, तर मांसाहारी थाळीच्या किमती जवळजवळ 2 % ने कमी झाल्या. शाकाहारी थाळीच्या किंमती कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कांदा, बटाटे आणि टोमॅटो यांच्या किंमतीत अनुक्रमे 5%, 7% आणि 8% ची घट. ही किंमत घसरण रब्बी हंगामातील नवीन पिकांच्या बाजारातील आगमनामुळे शक्य झाली. विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये, जसे की तमिळनाडू आणि कर्नाटक, रब्बी पिकांचे उत्पादन वाढले, कारण पाण्याच्या साठ्यांचे प्रमाण चांगले होते आणि पिकांचे क्षेत्रही वाढले होते. यामुळे टोमॅटोच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 34% ने कमी होऊन 21 रुपये प्रति किलोवर आल्या.
मांसाहारी थाळीच्या किंमतीत घट होण्याचे कारण म्हणजे ब्रॉयलर कोंबडीच्या किंमतीत 7% ची घसरण. उत्तर भारतात कोंबडीचा पुरवठा वाढला, तर दक्षिण भारतात बर्ड फ्लूच्या भीतीमुळे मागणी कमी झाली. यामुळे कोंबडीच्या किंमती कमी झाल्या, ज्या मांसाहारी थाळीच्या खर्चात 50% वाटा राखतात. याशिवाय, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 3% ची घट झाली, ज्यामुळे थाळीच्या एकूण खर्चात आणखी बचत झाली. (हेही वाचा: World's Fourth-Largest Economy: भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनेल जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- IMF)
काही किंमती वाढल्याने मर्यादित राहिली बचत-
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत बटाट्याच्या किंमतीत 2%, कांद्याच्या किंमतीत 6% आणि खाद्यतेलाच्या किंमतीत 19% ची वाढ झाली. कांद्याच्या कमी उत्पादनामुळे आणि परदेशातून वाढलेल्या मागणीमुळे कांद्याच्या किंमती वाढल्या, तर बटाट्याच्या काही पिकांना पश्चिम बंगालमध्ये नुकसान झाल्याने त्यांच्या किंमतीतही वाढ झाली. खाद्यतेलाच्या किंमती वाढण्यामागे आयात शुल्क आणि जागतिक बाजारातील तेलाच्या किंमतीतील चढउतार कारणीभूत होते.
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीतील फरक-
क्रिसिलच्या अहवालानुसार, शाकाहारी थाळीमध्ये रोटी, कांदा, टोमॅटो, बटाटे, तांदूळ, डाळ, दही आणि सलाड यांचा समावेश होतो, तर मांसाहारी थाळीमध्ये डाळीऐवजी ब्रॉयलर कोंबडीचा समावेश केला जातो. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमतींमध्ये वेगवेगळे कल दिसून येत आहेत. शाकाहारी थाळीच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढल्या होत्या, कारण कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या किंमतीत वाढ झाली होती. याउलट, मांसाहारी थाळीच्या किंमती कमी झाल्या, कारण कोंबडीच्या किंमती कमी झाल्या. एप्रिल 2025 मध्ये मात्र दोन्ही थाळ्यांच्या किंमती कमी झाल्या, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
भविष्यातील अंदाज-
क्रिसिलच्या मते, देशांतर्गत उत्पादनात वाढ होत असताना गहू आणि डाळींचे भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. जागतिक पुरवठा वाढल्याने, प्रामुख्याने अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि मलेशियामधून, पुढील दोन-तीन महिन्यांत खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. निर्यातीत वाढ होण्याच्या अंदाजासोबत तांदळाच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. भाज्यांमध्ये कांद्याच्या किमती मर्यादित राहण्याची शक्यता आहे, तर हंगामानुसार टोमॅटोच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे, असेही त्यात म्हटले आहे.