Ganeshotsav 2019: उकडीचे मोदक जितके स्वादिष्ट तितकेच या '6' कारणांसाठी आरोग्यदायी; फीटनेस फ्रिक्ससाठी असे बनवा लो कॅलरी मोदक!
Ukdiche Modak Health Benefits (Photo Credits: Wikicommons)

Health Benefits Of Steamed Modak: गणेशोत्सव (Ganeshotsav 2019)  म्हणताच चटकन डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टींची यादी केल्यास बाप्पाच्या आवडीचा मोदक (Modak) हा नेहमीच अग्रेसर असतो. उकडीचे मऊशार, अगदी ओठाने तुटेल असे आवरण, त्यात खुसखुशीत भाजलेलं सारण आणि वरून तुपाची धार असा मोदकाचा थाट आठवतात तोंडाला पाणी येतं. पण दुसरीकडे इतकं गोड आणि तेलातुपाचं खाणं लगेचच कॅलरीजची आठवण करून देतं. पण यंदा बाप्पाच्या मोदकप्रेमी पण फिटनेस फ्रिक भक्तांना कॅलरीजची चिंता न करता मोदकांवर मनसोक्त ताव मारता येईल अशी काही माहिती आम्ही आपल्याला सांगणार आहोत. उकडीचा मोदक हा जितका चविष्ट आहे तितकाच आरोग्यदायी आहे याची साक्ष मोदकासाठी लागणारी सामग्रीचं पटवून देते. विश्वास बसत नाहीये? चला तर मग पाहुयात उकडीच्या मोदकाचे सामान आणि त्याचे काही आरोग्याला फायदेशीर गुण. (Ganeshotsav 2019: उकडीचे ते Nutella बॉम्ब मोदक; बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचे हटके व्हर्जन चाखण्यासाठी मुंबईतील या पाच ठिकाणांना नक्की द्या भेट!)

वजन घटवते खोबरे

साधारणतः वजन घटवण्याचा मिशन वर असलेल्या व्यक्तीला गोड पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो मात्र मोदक हा त्याला अपवाद म्हणता येईल.मोदकातील प्रमुख सामग्री, खोबऱ्यात असलेल्या गुणधर्मामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो. उकडीच्या मोदकाने पोट भरते आणि विनाकारण खाण्याची इच्छा मरते, परिणामी वजन घटण्यास मदत होते.

शरीरातील लोहाचे प्रमाण कायम ठेवणारा गूळ

साखरेचा पर्याय म्हणून ओळखला जाणारा गूळ हा शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतो (काळा गूळ वापरल्यास अति उत्तम) परिणामी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही फायदा होतो.

बद्धकोष्ठ व सांधेदुखी वर गुणकारी तूप

उकडीचे मोदक हे साधारण तुपासोबत खाल्ले जातात, किंवा अनेकदा मोदकाच्या सारणात तूप घातले जाते. तुपामुळे सांधेदुखीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, तसेच आर्थ्राईटीसच्या समस्या आटोक्यात राहतात. याशिवाय बद्धकोष्ठ सारख्या समस्येचा त्रास कमी करण्यास उकडीचे मोदक फायदेशीर आहेत. आतड्यांजवळील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

पित्ताचा त्रास संपवते वेलची

अनेकदा वेळच्यावेळी न जेवल्याने पचनाचा आणि त्यामुळे पित्ताचा त्रास उदभवतो, मात्र मोदकाच्या वापरण्यात येणारी वेलची पित्ताचा त्रास संपवण्यास नक्कीच फायदेशीर ठरते. वेलचीमुळे शरीराला थंडावा मिळतो, तसेच तोंडाच्या दुर्गंधीवर देखील हा एक नामी उपाय आहे.

उत्साह टिकवणारा सुका मेवा

काही घरांमध्ये मोदकाच्या सारणात काजू, बदाम, खारीक व अन्य सुका मेवा टाकायची रेसिपी फॉलो केली जाते. या मेव्यात असणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे शरीरात एनर्जी टिकून राहते. (Ganesh Chaturthi 2019 Special Ukdiche Modak: गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक घरच्या घरी झटपट कसे बनवाल? (Watch Video)

रक्तदाब नियंत्रणात राहते

मोदक हा तांदूळ, खोबरं, गूळ यांच्या मिश्रणाने बनवलेला असतो. त्यामुळे मोदकाचा ग्ल्यास्मिक इंडेक्स कमी असतो. उकडीच्या मोदकाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये झटकन चढ - उतार होण्याचा धोका नसतो. याशिवाय मोदकांचे सेवन हे मासिक पाळीशी संबंधित आजारांवर देखील गुणकारी आहे.

Low Calories मोदक कसे बनवाल?

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तळलेले मोदक बनवण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे कॅलरीज वाढण्याची शक्यता असते मात्र एका उकडीच्या मोदकाची पौष्टिक मूल्ये तपासल्यास, त्यात 126 कॅलरीज असतात ज्यातील 80 कॅलरीज या कार्बोहायड्रेट तर 5 कॅलरीज या प्रोटीनच्या रूपात असतात. त्यामुळे यापुढे मोदक खायचा झाल्यास करण्याचे कारण नाही मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका!

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)