World Sickle Cell Day 2020 (PC - File Photos)

World Sickle Cell Day 2020: तुम्ही लहानपणी किंवा आता रेडिओ, टीव्हीवर सिकलसेल आजाराविषयी जाहिराती ऐकल्या असतील. मात्र, हा आजार नेमका काय असतो? हा आजार नेमका कोणाला होतो? हा आजार झाल्यावर शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसतात? या आजारावर कोणते उपचार केले जातात? याविषयी आपल्याला काहीही माहिती नसते. दरवर्षी 19 जून हा दिवस 'जागतिक सिकल सेल दिवस' म्हणून पाळला जातो.

सिकल सेल आजार म्हणजे काय?

‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. ‘सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ गवत कापण्याचा विळा किंवा कोयता असा होतो. निरोगी व्यक्तीच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. मात्र, सिकल सेल झालेल्या रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या दिसतात. (हेही वाचा - Yoga at Home, Yoga with Family थीम वर साजरा होणार यंदाचा जागतिक योग दिवस; आयुष मंत्रालयाकडून खास तयारी)

सिकल सेल रुग्णाच्या पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून येतो. त्यामुळे त्यास ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असं म्हटलं गेलं. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होते. यालाच ‘अ‍ॅनिमिया’ तसेच ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ असं म्हटलं जातं. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे.

सिकल सेल आजाराचे लक्षणं -

या आजाराच्या रुग्णांमध्ये शारिरिक थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, डोळे पिवळसर दिसणे अशी लक्षणं दिसतात. ऋतू बदलांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक वाढते. हा आजार आनुवंशिक आहे. त्यामुळे तो बरा होण्याची शक्यता कमी असते. परंतु, आता वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन शोध लागले असून पाश्चिमात्य देशांत बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, जीन थेरपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन असे आधुनिक उपचारांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. परंतु, या उपचार पद्धती अत्यंत खर्चीच आहेत. त्यामुळे सर्वासामान्य नागरिकांना ही उपचारपद्धती न परवडणारी आहे. (हेही वाचा - Health Benefits Of Sprouts: रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या)

सिकल सेल आजारावरील उपचार -

सिकलसेल आजार पूर्णपणे नष्ट होण्यासाठी कोणतेही औषध अद्याप उपलब्ध नाही. परंतु, हा अनूवांशिंक विकार असल्यामुळे दोन वाहक किंवा पिडीतांनी लग्न टाळल्यास या आजाराचा प्रसार रोकता येऊ शकतो. सिकलसेल असणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकारकडून ओळखपत्र देण्यात येते आणि शासकीय दवाखान्यात मोफत औषधोपचाराची सुविधा देण्यात येते.