World Cancer Day 2020: 'जागतिक कर्करोग दिवस' निमित्त जाणून घ्या कॅन्सरची लक्षणं
World Cancer Day 2020, (फोटो क्रेडिट्स: Pixabay)

World Cancer Day 2020: प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारीला 'जागतिक कॅन्सर दिवस' (World Cancer Day) साजरा केला जातो. तज्ञांच्या मते भारतात सर्वाधिक गतीने वाढणारा आजार म्हणजे कॅन्सर होय. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. कॅन्सर दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागृकता वाढवणे आणि या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे. सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचे निदान झाल्यास त्यावर उपचार करणे आणि त्यातून बाहेर पडणे शक्य होते.

तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाचे व्यसन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसेच दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता असते. स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदलांमुळे जनुकीय बदल होऊन कर्करोग होऊ शकतो. आज 'जागतिक कर्करोग दिवसा'चे औचित्य साधून कॅन्सरच्या लक्षणांविषयी माहिती जाणून घेऊयात. (हेही वाचा - World Cancer Day 2020: 'जागतिक कर्करोग दिवस' निमित्त जाणून घ्या कर्करोगाचे विविध प्रकार आणि कारणे)

कॅन्सरची लक्षणं - 

शरीरात थकवा जाणवणे -

दिवसभर थकवा जाणवणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. पुरेसा आराम करूनही थकवा जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

अचानक वजन घटणे -

अचानक वजन घटणे हेदेखील कॅन्सरचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तुमचे वजन अचानकपणे कमी होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात-लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

छातीतील गाठ जाणवणे -

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर उद्धभवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ब्रेस्टच्या रंगामध्ये बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात-लवकर तपासणी करून घ्या. वेळीच उपाय केल्याने कर्करोगाचा धोका टळू शकतो.

त्वचेवर जखमा होणे -

तुमच्या त्वचेवर कोणताही मार न लागता जखणा होत असतील तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. अंगावर लाल किंवा काळ्या रंगाचे चट्टे असतील तर वेळीच तपासणी करून घ्या.

फोड किंवा गाठ -

शरीरातील कोणत्याही भागात फोड किंवा गाठ जाणवतं असल्यास तपासणी करून घ्या. या गाठीवर वेळीच उपचार केल्यास तुमची कर्करोगापासून मुक्तता होऊ शकते. तसेच त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर तो संपूर्ण शरीरात पसरण्याची शक्यता असते.