
महाराष्ट्रामध्ये 21 जुलै पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात झाली आहे. दरम्यान आज (24 जुलै) दिवशी या पवित्र महिन्यातील पहिली विनायकी चतुर्थी आहे. मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या पुजनाचा आजचा दिवस गणेशभक्तांसाठी खास आहे. दर महिन्याला अमावस्या नंतर येणाऱ्या शुक्ल पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) साजरी करतात. आजची विनायकी श्रावण महिन्यात असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. मग विघ्नहर्त्या गणरायाची विनायकी चतुर्थी दिवशी कशी पूजा केली जाते? त्याचा मुहूर्त काय? हे नक्की जाणून घ्या आणि श्रीगणेशाची मनोभावे पूजा करा. काही गणेशभक्त संकष्टी आणि विनायकी चतुर्थी दिवशी एका दिवसाच्या व्रतामध्ये उपवास देखिल करतात.
विनायकी चतुर्थी 2020 तारीख आणि तिथी वेळ
श्रावण शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थी जुलै महिन्यात 24 जुलै दिवशी आहे. दरम्यान दाते पंचांगानुसार श्रावण शुक्ल चतुर्थीची सुरूवात 23 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी सुरू होणार आहे तर 24 जुलैच्या दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी संपणार आहे.
विनायक चतुर्थी पूजाविधी
विनायक चतुर्थी दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर देवघरात गणेशमूर्तीची पुजा करतात.
काही ठिकाणी गणेशमूर्ती नसल्यास सुपारी प्रतिकात्मक पूजण्याची पद्धत आहे.
दिवा, उदबत्ती ओवाळून गणेशमूर्तीवर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवली जाते.
दरम्यान या दिवशी गणेश मूर्तीला जास्वंदाचं फूल, दुर्वा वाहतात. नैवेद्याला गूळ खोबरं, उकळलेलं ताजं दूध किंवा मोदक ठेवले जातात.
गणेश पूजा करताना श्री गणेशाय नम: किंवा अथर्वशीर्ष, गणपती स्त्रोत्र म्हटलं जाते. याच्या माध्यमातून गणेश वंदना केली केली जाते. गणपती हा विघ्नहर्ता, बुद्धीची देवता समजला जातो. त्यामुळे संकटाचा नाश व्हावा, नव कौशल्य, ज्ञान प्राप्तीची आराधना करण्यासाठी तसेच मंगल कामाची सुरूवात करण्यासाठी गणरायाची पूजा केली जाते.
टीप: सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. दरम्यान लेटेस्टली मराठीचा कोणत्याही धार्मिक भावना, अंधश्रद्धेला पुरस्कार करण्याचा हेतू नाही.