प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला वसंत पंचमीचा (Vasant Panchami) सण साजरा केला जातो. पौराणिक मान्यतानुसार, वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञानदेवी सरस्वतीचा जन्म झाला होता. याच दिवशी सरस्वतीचे पृथ्वीवर आगमन झाले होते. याच गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. वसंत ऋतुमध्ये जास्त हिवाळा किंवा उष्णता नसते, म्हणून याला सर्व ऋतूंचा राजा म्हटले जाते.
वसंत ऋतुच्या आगमनाची चाहुल वसंत पंचमीच्या दिवशी होते. यावर्षी वसंत पंचमीचा उत्सव 29 तसेच 30 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. चला जाणून घेऊया वसंत पंचमीचे महत्त्व आणि सरस्वती पूजेसाठी शुभ मुहूर्त
वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे.
वसंत पंचमी पूजा शुभ मुहूर्त 2020 -
सरस्वती पूजा मुहूर्त - सकाळी 10:45 ते दुपारी 12:35
पंचमी तिथीची सुरुवात - (29 जानेवारी 2020) - 10:45 पासून
पंचमी तिथी समाप्ती - (30 जानेवारी 2020) - दुपारी 1.18
या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात.
वसंत पंचमीला पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान करावे. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करुन उपासना करावी. देवी सरस्वतीच्या मूर्तीला पिवळा कपडा घालून तिची स्थापना करावी. तिच्यासमोर केशर, हळद, तांदूळ, पिवळी फुले, पिवळ्या मिठाई, दही, हलवा इत्यादीसह प्रसाद म्हणून ठेवा. हळदीच्या माळेने देवी सरस्वती जप, ॐ ऐं सरस्वत्यै नमः या मूल मंत्रांचा जप करावा. सरस्वती देवीची यथासांग पूजा करावी.
यंदा वसंत पंचमीदिवशी सिद्धी, सर्वार्थ सिद्धि आणि रवियोग बनत आहेत. या तीन शुभ योगांच्या निर्मितीबरोबर नवीन कार्याची सुरुवात करण्यास हा अतिशय शुभ दिन मानला आहे. या दिवशी लग्नासह मंदिराची स्थापना, घराचा पाया, घराचे प्रवेशद्वार, वाहन खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते. तसेच अनेक लोक घरातीच लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवातही याच दिवसापासून करतात. (हेही वाचा: Shani Rashi Parivartan 2020: मौनी अमावस्या दिनी आज होणार शनीचे संक्रमण; पहा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार?)
दरम्यान, कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत. आपल्याकडील प्रत्येक सण, उत्सवाला एक विशेष अर्थ आहे. तसंच वसंत पंचमीही अर्थपूर्ण आहे. सृष्टीतील नवचैतन्य, नवनिर्मितीमुळे मिळणारा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.