Tulsi Vivah 2019: स्त्री-पुरुषांमधील नैतिक संबंध समाजमान्य पद्धतीने स्विकारले जावे यासाठी तसेच निसर्गचक्र चालविण्यासाठी लग्न हा भारतीय संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानवी जीवनात स्त्रीप्रतिष्ठा महत्त्वाची समजली जाते. म्हणून स्त्रीच्या आवडीप्रमाणे तिला तिचा साथीदार मिळाला पाहिजे. त्यामुळे लग्नसंस्थेची प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने 'तुलसी विवाह' (Tulsi Vivah 2019) ही संकल्पना आपल्या परंपरेत सांगितलेली आहे.
वृंदा नावाच्या स्त्रीचे विष्णूंवर प्रेम होते. विष्णूंना त्यावेळी लग्न करणे शक्य नव्हते. म्हणून मी कृष्णावतार घेईन त्यानंतर माझीच शक्ती असलेल्या शाळिग्राम शिळेशी तुझे लग्न भारतीय परंपरेत लावले जाईल, असे वचन त्यांनी तुळशीला दिले होते. त्यामुळे हे लग्न ‘तुळशीचे लग्न' म्हणून संबोधले जाते. तुळशी विवाह हा केवळ काही धार्मिक किंवा सामाजिक विधी नाही. तर निसर्गचक्र चालू राहण्यासाठी ही विवाहाची व्यवस्था आजही टिकून आहे. सध्या कार्तिक मास सुरू आहे. या महिन्यात व्रत, पूजा आणि कार्तिक स्नान याचे अत्यंत महत्त्व आहे. कार्तिक महिना हा सर्वात पवित्र महिना असल्याचे मानले गेले आहे. दिवाळी नंतर कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला सुरुवात होते. कार्तिकी द्वादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत नेमकी कधी तुळशी विवाहाचा मुहूर्त असतो, हे जाणून घेऊयात...
तुलसी विवाह मुहूर्त -
यंदा 9 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली असून 12 नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे. कार्तिकी द्वादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुम्ही सायंकाळी दिवे लावल्यानंतर कधीही तुलसी विवाह लावू शकता.
तुलसी विवाह पूजाविधी -
पौराणिक कथेनुसार, घरामध्ये तुळशीचे रोप लावण्याची पद्धत आहे. तुळस ३ वर्षांची झाल्यानंतर तिचा विवाह करण्याची लावण्याची पद्धत आहे. या दिवळी तुळशीला नववधुप्रमाणे सजवले जाते. तसेच तुळशीभोवती रांगोळी काढून वृंदावनात ऊस पुरून त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात.
तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. सोबतच विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची पूजा केली जाते . घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न केला जातो. त्यानंतर तुळशीमातेला आणि शाळीग्राम देवतेला गोड नैवद्य दाखवला जातो. त्यानंतर घरातील सर्व मंडळी जेवण करतात.