Tulsi Vivah 2019: तुळसी विवाह करण्याची ‘ही’ योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?
तुळशी विवाह (Photo Credit - Facebook)

Tulsi Vivah 2019: दिवाळीचा सण साजरा झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाह करण्याची पद्धत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच तुळशी विवाहाची उत्सुकता असते. तुळशी विवाह पार पाडल्यानंतर लग्न सोहळ्याला सुरुवात होते. अनेक ठिकाणी तुळशी विवाह मंगलअष्टकाच्या सुरात पार पडतो. यंदा 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची सांगता होणार आहे.

अनेकदा लोकांना तुळशी विवाहाची योग्य पद्धती माहित नसते. त्यामुळे केवळ तुळशी वृंदावन सजवून आणि फटाके वाजून तुळशी विवाह पार पाडला जातो. परंतु, तुळशी विवाह करताना तो योग्य पद्धतीने करणं गरजेच आहे. चला तर मग या खास लेखातून तुळशी विवाह करण्याची योग्य पद्धती जाणून घेऊयात.

हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी पूजन करताना ‘या’ 5 गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ

तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचे समजले जाते. काही ठिकाणी घरातील लहान मुलांचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजविण्यात येते.

तुळशी विवाह करण्याची पद्धती

 •  तुळशी विवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घाला आणि पूजा करा.
 • मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
 • चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
 • यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
 • यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
 • गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
 • मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
 • यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
 • नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
 • शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.
 • नंतर ब्राह्मण भोजन करवून नंतर स्वत: अन्न ग्रहण करावे.

तुळशी हे केवळ रोप नसून हिंदू धर्मामध्ये तिला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. असं म्हटलं जातं की, तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक आधार प्राप्त झाला नाही.