Shakambhari Navratri 2021: शाकंभरी नवरात्रोत्सव यंदा 21 जानेवारी पासून; जाणून घ्या या नवरात्रीचं महत्त्व
Shakambari Navratri | File Photo

चैत्र नवरात्र्, शारदीय नवरात्र नंतर उत्साहाने साजरी केली जाणारी तिसरी महत्त्वाची नवरात्र म्हणजे शाकंभरी नवरात्र (Shakambhari Navratri). यंदा महाराष्ट्रात शाकंभरी नवरात्र 21 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत साजरी केली जाणार आहे. दरम्यान शाकंभरी नवरात्र ही पौष शुक्ल सप्तमी ते पौष पौर्णिमेपर्यंत साजरी करण्याची प्रथा आहे. या नवरात्रीला देखील पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात तुळजापूरला भवानी मातेचा या शाकंभरी नवरात्रोत्सवात साजरा केला जाणारा सोहळा छोटा दसरा म्हणून देखील ओळखला जातो. शाकंभरी नवरात्रीचा शेवट पौष पौर्णिमेला होतो. हा दिवस शाकंभरी जयंती (Shakambhari Jayanti) म्हणून साजरा केला जातो.

दरम्यान अन्य नवरात्रींप्रमाणे शाकंभरी नवरात्रीची सुरूवात ही प्रतिपदेपासून होत नाही. शाकंभरी नवरात्र सप्तमी पासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते त्यामुळे ती 8 दिवसांची नवरात्र आहे. नक्की वाचा: January 2021 Festival Calendar: जानेवारी 2021 महिन्यातील 'हे' दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या सण आणि उपवासाच्या तारखा.

पुराणात सांगितलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्नपाण्याविना उपाशी तळमळत होते. त्यामध्ये अनेकांचा भूकबळीने मृत्यूही झाला. देवीला यामुळे मानवजातीची करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही बचावले. यानंतर देवीला 'शाकंभरी' हे नाव मिळाले. दरम्यान पौष महिना हा हिवाळ्यातील असल्याने या काळात ताज्या भाज्यांचा सर्वत्र मुबलक साठा असतो.

शाकंभरी देवीच्या नवरात्रोत्सवात भाज्यांचा नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक भाज्यांचा आस्वाद घेता येतो. शाकांभरी देवीला दुर्गा मातेच्या अत्यंत दयाळू आणि विनम्र रूप मानलं जातं.