Savitribai Phule Punyatithi: सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांंच्या 'आधुनिक कवयित्री' पैलूविषयी!
सावित्री बाई फुले (Photo Credits: Twitter)

Savitribai Phule Poems:  महिला, दलित समाजातील लोकांना अत्यचाराविरूद्ध आवाज उठवून शिक्षणाची कवाडं खुली करून देणार्‍यांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भरतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी जात, पात, लिंग भेद सारा मागे सारून मुलींना, महिलांना, विधवांना घराबाहेर पडून शिकण्याच्या संधी खुल्या करून दिल्या. आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. 3 जानेवरी1831 साली सातार्‍याच्या नायगाव या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला. अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी ज्योतिबांसोबत लग्न केले. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती मात्र घरातून विरोध असल्याने ज्योतिबांसोबत शेतीकाम करताना शिक्षण घेत होत्या. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांनी समाजसेवेचा वसा पुढे चालवला. 1896-97 दरम्यान पुण्यात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. हा जीवघेणा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला होता. मात्र यामधून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार द्यायल्या पुढे सरसावल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यामध्येच 10 मार्च 1897 मध्ये त्यांचे निधन झाले. समाजसेविका म्हणून सावित्रीबाई अनेकांना ठाऊक होत्या मात्र त्या उत्तम कवियित्री देखील होत्या. मग आज सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घ्या त्यांचे कवितासंग्रह आणि त्यांच्या रचना. सावित्रीबाई फुले - भारतामध्ये मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुली करणारी पहिली महिला शिक्षक यांच्याबद्दल खास गोष्टी

सावित्रीबाईंचं साहित्य

काव्यफुले (काव्यसंग्रह)

1854 साली सावित्रीबाईंचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

काव्यफुलेमधील पंक्ती -

कोण कुठली। कळी फुलांची

जुनी विसर। नवीन पाही

रीत जगाची। उत्सृंखल ही

पाहुनिया मी । स्तिमित होई

पुरूषप्रधान संस्कृतीवर केलेला प्रहार-

रूप तियेचे करी विच्छिन्न

नकोसे केले तिजला त्याने

शोषून काढी मध तियेचा

चिपाड केले तिला तयाने

पती ज्योतिबांच्या कार्याचा सन्मान करणारी कविता

काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।

सर्वा जागे केले। या सूर्याने ।।

शूद्र या क्षितीजी।

जोतिबा हा सूर्य ।।

तेजस्वी अपूर्व। उगवला।।

यासोबतच त्यांनी 'सावित्रीबाईंची गाणी' (1891) साली लिहलेला कवितासंग्रह आहे. तर सावित्रीबाईंनी पती जोतिरावांच्या निधनानंतर ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’हे पद्यमय चरित्र लिहिले आहे. 'माता सावित्रीबाई गीत' सहित 'या' 5 गाण्यांमधून जाणून घ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकेच्या कार्याची महती.

समाजाच्या विचारसरणी पासून दूर जात ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले. त्या दरम्यान फुले यांना खुप संघर्ष करावा लागला होता. तरीही लोकांच्या शिव्याशापांकडे दुर्लक्ष करत फुले यांनी सावित्रीबाई यांचे नाव शाळेत दाखल केले. सावित्रीबाई यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजातील अन्य महिलांनासुद्धा शिक्षण देण्याचा निर्धार केला.मात्र समाजातील रुढी आणि परंपरा यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी महिलांना यशस्वीपणे शिक्षण दिले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 8 ऐवजी 10 मार्चला महिला दिन साजरा करतात.