Rishi Panchami (Photo Credits: Instagram/ wikipedia)

Rishi Panchami 2019 Vrat Date and Vidhi: भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश पूजन झाल्यानंतर दुसर्‍यादिवशी महाराष्ट्रासह देशभरात ऋषि पंचमी (Rishi Panchami 2019) साजरी केली जाते. नकळत झालेल्या पापांमधून मुक्तता मिळावी आणि हिंदू पुराणानुसार, सातही ऋषींच्या स्मरणार्थ, त्यांच्याप्रती असणारा आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचं व्रत करतात. या व्रता दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. यंदा महाराष्ट्रात ऋषी पंचमी 3 सप्टेंबर 2019 दिवशी साजरी केली जाणार आहे.

ऋषीपंचमी व्रत

महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी ऋषी पंचमी साजरी करताना कश्यप, अत्रि,

भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वशिष्ठ या सात ऋषींचे स्मरण केले जाते. महिला आणि तरूणी ऋषी पंचमीचा उपवास करताना दोन वेळेस केवळ ऋषी पंचमी विधेष बनवलेली भाजी आणि बैलांच्या मेहनतीशिवाय पिकवलेला जाडा तांदळापासून बनवलेला भात, काकडी, दही,चटणी असा हलका आहार करून दिवसभर व्रत करतात. या व्रतामध्ये जेवण वगळता केवळ दूध आणि फलाहार करण्याचा सल्ला दिला जातो. गणेशोत्सव विशेष : कशी बनवाल ऋषीपंचमीची हेल्दी टेस्टी भाजी ?

ऋषी पंचमी दिवशी व्रताचा एक भाग म्हणून आघाड्याच्या सात पानांची जुडी केली जाते. ती डोक्यावर ठेवून सात वेळेस पाणी ओतले जाते. यानंतर कोरे कपडे घालून उपवासाचे जेवण घेतले जाते.

ऋषी पंचमी तिथी वेळ:

महाराष्ट्रात दाते पंचांगानुसार, पंचमीची तिथी 3 सप्टेंबरला मध्यरात्री 01:54 नंतर सुरू होते आणि 23:28ला संपते.

ऋषी पंचमी हा गणेश चतुर्थीनंतर येणारा दुसरा दिवस असतो. या दिवशी अनेक घरांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक तलावं, पाणवठे, नदी किंवा आता कृत्रिम तलावांमध्ये गण्पतीचं विसर्जन केलं जातं.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.