Rang Panchami 2020: नाशिक मध्ये रहाडीत खेळली जाते रंगपंचमी; 'या' पेशवेकालीन परंपरेबद्दल वाचा सविस्तर
Nashik Rangpanchami 2020 (Photo Credits: Facebook)

फाल्गुन कृष्ण पौर्णिमेपासुन सुरू झालेला होळीचा (Holi) उत्सव फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या (Rang Panchami) दिवशी संपुष्टात येतो. आज, (13 मार्च) रोजी हाच रंगपंचमीचा सोहळा रंगणार आहे. या निमित्ताने नाशिक (Nashik) मध्ये पारंपरिक सोहळा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या सोहळ्याची परंपरा ही पेशवेकालीन आहे. नाशिक मध्ये रंगपंचमी रहाडीवर खेळली जाते. वास्तविक यंदा जगभरावर कोरोना व्हायरसचे सावट असताना सुद्धा आज नाशकात रहाडीवरील रंगपंचमीचा उत्सव मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. याच निमित्ताने आज आपण या परंपरेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ही रहाड म्हणजे काय? पेशवेकाळात रंगपंचमी कशी खेळली जात होती,  याविषयी लेखातून जाणून घ्या.. (सोबतच, रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा रंगोत्सव!)

रहाड म्हणजे काय?

रहाडी म्हणजे दगडी बांधकाम केलेले हौद. सुमारे वीस-पंचवीस फूट लांब व रूंद, दहा ते बारा फूट खोल अशा या रहाडी आहेत. एरवी बुजविलेल्या या रहाडी रंगपंचम‌ीच्या पूर्वसंध्येला खोदण्यात येतात. त्यांची विधीवत पूजा करून त्यात रंग बनवले जातात. रंगपंचमीच्या दिवशी या रहाडी रंगाने काठोकाठ भरल्या जातात. त्यात उड्या मारून किंवा कुणाला उचलून रहाडीत फेकून मजा केली जाते. या रहाडींमध्ये रंग उकळून टाकला जात असून विधीवत पूजन करून रंग खेळण्याला सुरुवात केली जाते. रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान दोन दिवस तरी निघत नाही. राहाड मध्ये आंघोळ करणे याला धप्पा असे म्हणतात. काठावरून रहाडीत उडी मारायची किंवा सूर मारायचा आणि एकदा धप्पा मारला की बाजूच्या 20 ते 25 माणसावर पाणी उडते. हीच या खेळाची गंमत.

प्रत्येक रहाडी मध्ये ठरवून दिलेला रंगच बनवला जातो, हा रंग बनवणे हा वेगवेगळ्या संस्थांना, कुटुंबांना दिलेला मान आहे. उदाहरणार्थ, नाशिक मधील, पंचवटी येथील शनी चौकात रहाडीचा रंग गुलाबी असून, पूजेचा मान सरदार रास्ते आखाडा तालिम संघाकडे आहे. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या रहाडीचा रंग पिवळा असून, या रहाडीच्या पूजेचा मान सोमनाथ वासुदेव बेळे यांच्याकडे आहे.

पेशव्यांची रंगपंचमी

पेशवेकाळात पुण्यात रंगपंचमी साजरी केली जात होती. यावेळी नाशिक मधील सरदार मंडळी पुण्यातील पेशव्यांच्या दिमतीला असल्याने हीच परंपरा नाशिक मध्ये सुद्धा सुरु करण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करावी यासाठी हा रहाडीचा पर्याय तयार करण्यात आला. नाशिक शहरात पेशवेकाळातील 7 रहाडी आहेत.

दरम्यान, आज सुद्धा हा उत्सव धुमधडाक्यात, रंगीत वातावरणात साजरा केला जाणार आहे, यंदाचे वैशिष्ट्य असे की, दंडे हनुमान, काजीपुरा येथील रहाड यंदा 55 वर्षांनंतर रंगपंचमीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1965 पासून ही रहाड बंद होती.