PU LA Deshpande 103rd Birth Anniversary: पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त पहा त्यांच्या खास ढंगातील काही विनोदी कथा (Watch Video)
P. L. Deshpande | (File Image)

मराठी विनोदी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, तत्त्वज्ञ अशी अनेक बिरुदे मिरवणारे पु.ल.देशपांडे (Pu La Deshpande) हे कलेच्या बाबतीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पु.ल. देशपांडे यांनी नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले होते, त्यामुळे त्यांच्या कामाचा आणि अनुभवाचा आवाका फार मोठा होता. आजही संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे व्यक्तिमत्व म्हणून पु.ल.देशपांडे यांच्याकडे पाहिले जाते. आज (8 नोव्हेंबर 2022) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची जयंती. 8 नोव्हेंबर, 1919 साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला.

जीवनाचे मार्मिक निरीक्षण, मनन व चिंतन, व्यापक सहानुभूती, अभिजात रसिकता आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी विलक्षण आदर हा पु.ल देशपांडे यांच्या लेखनाचा मूलाधार, म्हणूनच आजही इतक्या वर्षानंतर त्यांचे लेखन मनाला भिडते.

पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी भागात झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. तर पु.ल.देशपांडे यांच्या 103 व्या जयंती निमित्त पहा त्यांच्या काही लोकप्रिय कथा-

दरम्यान, पु.ल.देशपांडे यांना 1990 मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. यासोबतच पुण्यभूषण, महाराष्ट्र गौरव, पद्मश्री, साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, महाराष्ट्र भूषण सन्मान, कालिदास सन्मान आदी अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाने 'पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना केली. (हेही वाचा: Kartik Tripurari Purnima 2022 Messages: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त WhatsApp Status, Wishes, Greetings, SMS, Images द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा!)

पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. देशपांडे यांचे साहित्य मराठीशिवाय इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.