दरवर्षी जगभरात जून महिना हा 'प्राइड मंथ’ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव विशेषत: एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या लोकांसाठी आहे, परंतु यामध्ये प्रत्येकजण सहभागी होऊ शकते. जून महिना हा एलजीबीटीक्यू म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीअर अशा लोकांसाठी गर्वाचा, अभिमानाचा महिना आहे. प्राइड मंथ हा आपली ओळख स्वीकारून त्याला अभिमानाने जगासमोर प्रकट करण्याचा महिना आहे. भारतामध्येही 'प्राइड मंथ’ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 काढून टाकल्यानंतर तर मोठ्या संख्येने लोक या उत्सवामध्ये सामील होत आहेत.
1969 च्या स्टोनवॉल दंगलीत (Stonewall Riots) सहभागी झालेल्या लोकांना आदरांजली म्हणून 'प्राइड मंथ' साजरा केला जातो. यासह हा महिना एलजीबीटीक्यू समुदायासाठी न्याय आणि समान संधी मिळविण्यासाठी देखील कार्य करतो. 28 जून, 1969 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील स्टोनवॉल इन या समलिंगी क्लबवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी नागरिक व पोलीस यांच्यामध्ये मोठे भांडण झाले व त्याव्हि परिणती दंगलीमध्ये झाली. 1970 मध्ये दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक आंदोलकांनी स्टोनवॉलजवळील रस्त्यावर मिरवणूक काढली. हा पहिला 'प्राइड मंथ' मानला जातो. (हेही वाचा: Frank Kameny Google Doodle: प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, LGBT कार्यकर्ते फ्रँक कॅमेनी यांच्या स्मरनार्थ गूगलने बनवले खास डूडल)
पुढे तो न्यूयॉर्क सिटी प्राइड मार्च मध्ये रुपांतरीत झाला व आता जगभरात हा दिवस साजरा केला जातो. 28 जून रोजी ‘प्राइड डे’ साजरा केला जातो. सॅन फ्रान्सिस्को कलाकार गिलबर्ट बेकर यांनी 1978 मध्ये प्राइड फ्लॅगची रचना केली होती. बेकर यांनी बनवलेल्या ध्वजावर 8 रंग होते - गुलाबी, लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि व्हायलेट. त्यानंतर सहा रंगांचा ध्वज दिसू लागला, जो आज वापरात आहे. या ध्वजावर लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि व्हायलेट रंग आहेत.
हा महिन्यात एलजीबीटीक्यू समुदायाची निगडीत अनेक कार्यक्रम होतात. ‘प्राइड ध्वज’ हा महिनाभर चालणार्या महोत्सवाच्या कार्यक्रमांचे प्रतीक आहे. यामध्ये रॅली, प्राइड परेड, कार्यशाळा, मैफिली आणि इतर असंख्य एलजीबीटीक्यू कार्यक्रमांचा समावेश आहे. यावेळी ‘प्राइड मार्च’ हे मोठे आकर्षण असते. या परेडमध्ये मध्ये एलजीबीटीक्यू समुदाय आपल्या लैंगिकतेचा अभिमान जगासमोर मांडतो.