Navratri 2019: आश्विन महिन्यात खेळला जाणारा भोंडला का आहे खास, जाणून घ्या या परंपरेची वैशिष्ट्य
Bhondala 2019 (Photo Credits: Youtube)

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्री (Navratri 2019) च्या सणाला सुरुवात होते. देवी रुपी स्त्रीशक्तीचा सन्मान करत नऊ दिवस मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडतो.  नवरात्रीला सुरवात होताच किंबहुना त्या आधीच गरबा (Garba), दांडियाची (Dandiya) क्रेझ पाहायला मिळते, पण या मुहूर्तावर आपल्या महाराष्ट्रात देखील एका धम्माल खेळाची परंपरा आहे हे तुम्हाला माहित आहे का? आश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून भोंडला सुरु होतो. लहान मुलींपासून विवाहितांपर्यंत सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणत फेर धरतात, आणि यालाच भोंडला (Bhondla) असे म्हंटले जाते. याआधी हत्तीच्या प्रतिमेची (प्रतिकृतीची) पूजा करण्याची रीत आहे तसेच या खेळानंतर वाटल्या जाणाऱ्या खिरापतीला (Khirapat) देखील खास महत्व आहे. यंदा 29 सप्टेंबर पासून नवरात्र व भोंडल्याचा सोहळा सुरु होणार आहे, चला तर मग याच निमित्ताने जाणून घेऊयात हा भोंडल्याची वैशिष्ट्य

भोंडला.. हादगा.. भुलाबाई

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने भोंडला खेळला जातो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या खेळाला हादगा म्ह्णूनही संबोधले जाते. विदर्भात या भोंडल्याला भुलाबाई असेही म्हंटले जाते. वास्तविक भोला म्हणजे शिव शंकर आणि म्हणून भुलाबाई म्हणजे उमा-पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असे नाव पडले आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी शेतकरी ज्वारीच्या धांड्यांनी अथवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यात भुलाबाईला बसवतात. या काळात खरिपाची पिके कापणीला येतात, यानिमित्ताने पार पडणारा भुलाबाईचा उत्सव हा नविन आलेल्या धान्याचे पूजन केले जाते.

हत्तीला आहे विशेष मान

भोंडल्याच्या कार्यक्रमात हत्तीला सर्वात जास्त मान दिला जातो. कोकण प्रांतात घराच्या अंगणात मधोमध पाटावर हत्तीची रांगोळी काढून त्याभोवती लहान मुली फेर धरतात, यावेळी ऐलमा पैलमा सारखी पारंपरिक गाणी म्हंटली जातात. काही ठिकाणी या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र लावले जाते. घाटावर कुमारिका पाटावर डाळ तांदूळ किंवा धान्याने हत्ती काढतात. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे त्याची पूजा करुन घरात समृद्धी येते असा यामागील विश्वास आहे.

भोंडला आणि खिरापत

खिरापत म्हणजेच खेळ खेळून, फेर धरून दमलेल्या लहान मुलींना वाटला जाणारा खाऊ. ज्यांच्याघरी भोंडला त्यांच्याघरी खिरापत असा एक अलिखित नियमच आहे. दरदिवशी वेगवेगळ्या घरात भोंडला खेळाला जात असल्याने या दिवसात खाण्यापिण्याची चंगळ असते.काही ठिकाणी पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा करत करत 9 व्या दिवशी 9 +1 (दसऱ्याची) खिरापत असते.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्या रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्ह्णून अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात होते. तर अलीकडे या परंपरेचा वारसा जपण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मग यंदा तुम्ही सुद्धा हा भोंडला खेळणार ना?