नवरात्र हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ती वाघावर आरुड असलेली दुर्गादेवी. दांडिया आणि गरबा. पण, या उत्सवाची ओळख इतकी मर्यादित नाही. त्याही पलीकडे या उत्सवाचे महत्त्व आहे. मुळात नवरात्र हा संस्कृत शब्द. हिंदू संस्कृतीत मानल्या जाणाऱ्या अनेक पवित्र काळांपैकी एक असा हा उत्सव. नवरात्र या शब्दाचा साधा अर्थ आहे 'नऊ रात्री'. काही लोक या 'नव'चा अर्थ नवा असेही घेतात. हा उत्सव तसा वर्षातून दोन वेळा येतो. एक शारदीय आणि दुसरा चैत्रीय. आपण इथे बोलतो आहोत ते शारदीय नवरात्रोत्सवाबद्दल.
नवरात्रीच्या नऊही रात्री तीन देवींची (पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती) पूजा केली जाते. ज्याला हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे. या देवींना नवदुर्गाही म्हटले जाते. नवदुर्गेला अनेक सिद्धी प्राप्त असल्याचे पुराण सांगते. या सिद्धीत काली ही प्रमुख आहे. भगवान शिवच्या शक्तींपासून उग्र आणि सौम्य अशी दोन रुपे प्राप्त केलेल्या अनंत सिद्धी दुर्गादेवीला प्राप्त आहेत. आश्विन महिन्यातील शुक्लपक्ष प्रतिपदेपासून नवरात्रोत्सव सुरु होतो. तो पुढील नऊ दिवस चालतो. या काळाला शारदीय नवरात्र म्हटले जाते.
शारदीय नवरात्रामध्ये दिवस छोटा होऊ लागतो. तर रात्रीचा कालावधी वाढताना दिसतो. ऋतूतही बदल होतो. निसर्ग लवकरच थंडी येणार असल्याची चाहूल देतो. वातावरणात होणारा बदल मानवाला त्रासदायक ठरु नये. यासाठी प्राचीन काळापासून नवरात्रोत्सव सुरु आहे. जेणेकरून ऋतूबदलाची जाणीव आणि माहिती लोकांना व्हावी. आजच्या काळात या उत्सवाचे स्वरुप बरेच बदलले आहे. या काळात उपास-तापासही केले जातात. उपवास कालावधीत संतुलित आणि सात्विक आहार घेणे केव्हाही उत्तम. या काळात मांसाहार वर्ज्य मानला जातो. चिंतन आणि मनन करण्यासाठी हा कालावधी उत्तम मानला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हा काळ उत्साह वाढवणारा असतो. नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रुपांची पूजा-अर्चा केली जाते.