Science Day | PC: PIB

भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.  चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. दरम्यान या दिवसाच्या सेलिब्रेशन साठी एक खास थीम देखील असते. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सेलिब्रेशनची थीम आज घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज “Global Science for Global Wellbeing” अर्थात "वैश्विक निरामयतेसाठी वैश्विक विज्ञान" या शीर्षकाअंतर्गत दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची संकल्पना विशद केली आहे. भारत 2023 मध्ये प्रवेश करत असताना, ही संकल्पना भारताची उदयोन्मुख जागतिक भूमिका आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वाढता वावर दर्शवते असे मंत्री म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, “ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीइंग” ची संकल्पना जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या भारताशी पूर्णपणे सुसंगत आहे,  आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या विकसनशील देशांच्या जागतिक दक्षिणेकडील देशांचा तो आवाज बनेल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारताने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रांच्या समुदायात जागतिक ठळक वावर प्राप्त केला आहे आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही परिणामाभिमुख जागतिक सहकार्यासाठी तयार आहोत. ते म्हणाले, जेव्हा चिंता, आव्हाने आणि मापदंडांनी जागतिक परिमाण ग्रहण केले आहे, तेव्हा निवारण देखील जागतिक स्वरूपाचे असले पाहिजे.

राष्ट्रीय विज्ञान दिन (NSD) दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी ‘रमण इफेक्ट’ शोधाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीइंग संकल्पनेची निवड ही वैश्विक निरामयतेवर परिणाम करणाऱ्या जागतिक स्तरावरील वैज्ञानिक मुद्द्यांची सार्वजनिक दखल घेण्याच्या उद्देशाने केली आहे.

ते म्हणाले, आज भारतीय वैज्ञानिक प्रगती प्रयोगशाळेपासून प्रत्यक्षात साकारली आहे, विज्ञानाच्या अनुप्रयोगांचा उपयोग घरोघरी सामान्य माणसाकरिता “सुखकर जीवनासाठी” केला जात आहे. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्थेने गेल्या साडेआठ वर्षांत अनेक नवीन ऐतिहासिक सुधारणा सुरू करून देशासाठी दूरगामी परिणाम घडवून आणले आहेत.