Akshaya Tritiya 2019: साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्त नेमके काय?
Jewellery | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हटलं की, पहिली गोष्ट तोंडात येते ती साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.  मुहूर्त म्हणजे कोणतेही चांगले कार्य करण्याची श्रेष्ठ वेळ! साधारणपणे कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी मुहूर्त काढला जातो. ज्यासाठी पंचांग शुद्धी, तारा शुद्धी, चंद्र शुद्धी आणि लग्न शुद्धी करणे आवश्यक असते. मात्र वर्षभरातील साडेतीन मुहूर्त असे आहेत की, ज्याला कोणत्याही शुद्धीची आवश्यकता नसते. हे त्यामुळे शुभकार्य करण्यासाठी लोकांचा साडेतीन मुहूर्ताकडे कल असतो. हे साडेतीन मुहूर्त नेमके कोणते आणि का हे आपण आज जाणून घेणार आहोत.

साडेतीन मुहूर्त कोणते?

  1. गुढीपाडवा
  2. दसरा
  3. अक्षय्य तृतीया

हे तीन पुर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. कोणतेही शुभकार्य, खरेदी, नवीन कार्याचा प्रारंभ आपण या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता करु शकतो.

साडेतीन मुहूर्तांचे विशेष महत्त्व काय?

१. गुढीपाडवा (Gudipadwa)- चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू वर्षाचा प्रारंभी दिवस गुढीपाडवा म्हणूनही ओळखला जातो.  हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो.

२. दसरा (विजयादशमी) (Dassera)- अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण मानला जातो. दसरा हा सण पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चार्तुवर्ण एकत्र आलेले दिसतात. त्यामुळे ह्या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.

३. अक्षय्य तृतीया (akshaya tritiya) – वैशाख शुक्ल तृतीय म्हणजेच अक्षय्य तृतीया. अक्षय म्हणजे जे जिचा क्षय होत नाही, जी सतत राहते ती अक्षय्य तृतीया. ही तृतीया जर बुधवारी आली आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल, तर ही अक्षय्य तृतीया लाभदायी मानली जाते. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. Gold Rate in Mumbai: अक्षय्य तृतीया दिवशी सोनं विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

४. बलिप्रतिपदा (Balipratipada) - हा दिवस साडेतीन मुहूर्तांतील अर्धा मुहूर्त मानला जातो. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा असते. गुढीपाडवा जसा हिंदू लोकांसाठी पहिला दिवस असतो, तसा बलिप्रतिपदा हा व्यापा-यांसाठी पहिला दिवस असतो.

आजवर आपण ब-याचदा ऐकलेल्या साडेतीन मुहूर्ताचे महत्त्व नेमके काय हे आज आपल्याला समजलचं असेल. मग तुम्ही ही ह्यातील योग्य मुहूर्त बघून तुमच्या घरातील शुभकार्य करुन घ्या आणि नवी सुरुवात करा.