अग्रायण किंवा मार्गशीर्ष (Margashirsha) हा हिंदू दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. हिंदू धर्मात हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. महाराष्ट्रात यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 13 डिसेंबर पासून होत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महिला महालक्ष्मीचे व्रत करतात. या व्रताला वैभवलक्ष्मी व्रत असेही संबोधिले जाते. आपल्या कुटुंबाला धन-धान्य, समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल, अशी मान्यता आहे.
मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरूवार पाळले जाणार आहेत. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. मात्र यंदा गुरुवार 11 जानेवारीला अमावस्या असल्याने, गुरुवारचे व्रत करुन उद्यापन करायचे असल्याचे काही पंडित सांगतात. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे, त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात.
महालक्ष्मी व्रत पूजा विधी-
घरातील ज्या देवीची पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करा. तिचे चौरंग किंवा पाट ठेऊन, त्याभोवती रांगोळी काढा. या पाटावर लाल कपडा अंथरा. या कापडावर तांदूळ किंवा गहू ठेऊन त्यावर कळस स्थापन करा. कळसात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. (हेही वाचा: Margashirsh Mass 2023 Wishes In Marathi: मार्गशीर्ष मासारंभ आणि गुरूवार व्रतानिमित्त WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे आप्तस्वकियांना द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!)
पूजा मांडल्यावर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, घरात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे. तिला हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा. दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदीकुंकू, फळे देऊन इतर वाण लुटले जाते.
जे कुणी श्री महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील, असे सांगितले जाते.