![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/Mahavir-Jayanti-1-784x441-380x214.jpg)
चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील त्रयोदशी ला जैन (Jain) समाजातील 24 तीर्थंकारांपैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस जैन धर्मीय (Jain religion) 'महावीर जयंती' (Mahavir Jayanti) म्हणून साजरा करतात. यंदा महावीर जयंती 17 एप्रिल 2019 बुधवारी आहे. भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. ('डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती' ते 'ईस्टर' मुळे 14-21 एप्रिल दरम्यान सलग सुट्ट्यांची चंगळ)
म्हणून त्यांना महावीर म्हटले जाते!
भगवान महावीर यांचा जन्म बिहारमधील लिच्छिवी वंशाचे महाराज सिद्धार्थ आणि त्यांची पत्नी त्रिशाला यांच्या पोटी झाला. भगवान महावीर यांच्या लहानपणीचे नाव वर्धमान होते. वर्धमान यांनी ज्ञान प्राप्तीसाठी वयाच्या अवघ्या तीसाव्या वर्षी राजमहलातील सुख आणि वैभव याचा त्याग करुन तपोमय साधनेचा मार्ग अवलंबला. त्यानंतर सुमारे साडे बारा वर्ष त्यांनी साधना केली. त्यांचे जीवन कष्टाचे एक जिवंत उदाहरण आहे. त्यांनी तप आणि ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा आणि विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे त्यांना 'महावीर' म्हणून ओळखले जावू लागले.
अहिंसेचा मार्ग
जैन धर्मातील लोक अगदी उत्साहात आणि आनंदात महावीर जयंतीचा उत्सव साजरा करतात. भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले. इतरांना मदत करण्याचा संदेश दिला. तसंच मदतीची गरज असणाऱ्यांना मदत न करणे ही देखील एक हिंसा असल्याची शिकवण महावीरांनी दिली.
म्हणून तीर्थकर म्हणून संबोधले जाते!
भगवान महावीर यांनी भक्तांना सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह आणि क्षमा या पाच व्रतांचे पालन करण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर साधु, साध्वी, श्रावक आणि श्राविका या चार तीर्थांची स्थापना केली. त्यामुळे त्यांना 'तीर्थंकर' असे म्हटले जाते. जातीपाती पासून दूर नेत समाज कल्याणाचा संदेश त्यांनी दिला. तीर्थ म्हणजे मार्ग. दुसऱ्यांना योग्य मार्ग शोधून देणारा म्हणजेच स्वतः तरुन दुसऱ्याला तारणारा तो तीर्थंकर.
अशी साजरी केली जाते महावीर जयंती
जैन धर्मातील लोक महावीर जयंतीचे पर्व 'महापर्व' म्हणून मानतात. या दिवशी जैन मंदिरात महावीरांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. त्यानंतर साग्रसंगीत पूजा करुन मूर्ती रथात बसवली जाते आणि शोभायात्रेला प्रारंभ होतो. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात. तर काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन गरीब व गरजूंना मदत केली जाते.