2021 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) 26 मे रोजी म्हणजेच उद्या होणार आहे. उद्या वैशाख महिन्याची पौर्णिमा आहे आणि त्यादिवशी चंद्रग्रहण देखील होणार आहे. हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण उपछाया ग्रहण असणार आहे. चंद्र पृथ्वीच्या छायेच्या अंधारातून जाणार आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण ही एक अशुभ घटना आहे. वर्षात असे काही दिवस आहेत जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात ज्यामुळे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते.
चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा, पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये अशा प्रकारे येते की, तिची सावली चंद्रावर पडते. तर सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ग्रहणाचा देश आणि जगावर तसेच 12 राशींवर परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणावेळी ब्लड मून भारतात दिसेल की नाही आणि त्याबद्दल काही रंजक माहिती.
चंद्रग्रहण केव्हा आणि कोठे पाहू शकाल?
वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 26 मे 2021 (बुधवार) रोजी होणार आहे आणि ते पूर्ण चंद्रग्रहण असेल असा दावा खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. वर्षाचे पहिले ग्रहण भारताचा काही भाग (अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल), दक्षिण आशिया, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि अंटार्क्टिका येथे पाहिले जाऊ शकते.
2021 मधील पहिले चंद्रग्रहण हा विशेषत: सुपर मून इव्हेंट होणार आहे, कारण त्याला सुपरमून म्हटले जात आहे. चंद्रग्रहणात लाल अगदी रक्ताप्रमाणे चंद्र असेल, ज्याला ब्लड मून म्हणूनही ओळखले जाते.
2021 मध्ये एकूण दोन चंद्रग्रहण होणार आहेत, ज्यापैकी पहिले चंद्रग्रहण 26 मे, 2021 रोजी दुपारी 2.17 वाजता सुरु होईल आणि संध्याकाळी 7.19 पर्यंत राहील. संपूर्ण चंद्रग्रहण चरण संध्याकाळी 4.39 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 4.58 वाजता संपेल. अशाप्रकारे या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 2 मिनिटे असेल आणि या दरम्यान, 14 मिनिटांचे पूर्ण चंद्रग्रहण असेल. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर 2021 रोजी होईल. (हेही वाचा: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन आनंदात साजरा करा हा दिवस)
सूर्य ग्रहणापेक्षा चंद्र ग्रहण तितके हानिकारक नसते. याचे सुतकही भारतात जिथे चंद्र दिसेल तिथेच लागू असेल. ग्रहण काळात सुतक वैध नसल्यामुळे देशातील मंदिरांचे दरवाजे बंद होणार नाहीत. यासह, शुभ कामांवरही कोणतेही बंधन येणार नाही.