Lalbaugcha Raja 2023

मुंबई मधील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विशेष आकर्षण  असतं ते म्हणजे लालबागच्या राजाचं. लालबागच्या चिंचोळ्या गल्लीमध्ये विराजमान झालेला बाप्पा मिरवणूकीला बाहेर काढताना गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचं कसब पणाला लागलेलं असतं. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मंडपामध्ये 10 दिवसांत कोट्यावधी भाविक येऊन जातात. पण विसर्जनाला देखील बाहेर पडल्यानंतर बाप्पाचं जागोजागी दर्शन घेण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी असते. लालबाग ते गिरगाव चौपाटीचा अवघ्या काही  मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी बाप्पाला सुमारे 16-17 तासांचा कालावधी लागतो. मग तुम्हांलाही बाप्पाचं यंदा मंडपामध्ये दर्शन झालं नसेल तर तो विसर्जनाला निघालेला असताना कुठे दर्शन घेता येऊ शकतं हे नक्की पहा.

लालबाग मार्केट मधून निघालेला बाप्पा लालबाग, भारतमाता सिनेमा, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचतो. Anant Chaturdashi Ganpati Visarjan Muhurat 2023: अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन मुहूर्त घ्या जाणून .

'या' मार्गाने होणार लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक -

लालबागचा राजा मंडळ ते चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) : लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक लालबाग फ्लायओव्हरच्या खालून चिंचपोकळी स्टेशन ब्रिज (पश्चिम) वर जाते.

चिंचपोकळी स्थानक ते भायखळा स्थानक (पश्चिम): चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून लालबागचा राजाची मिरवणूक डेलिस्ले रोडने भायखळा रेल्वे स्थानकाकडे (पश्चिम) जाते.

भायखळा स्टेशन ते नागपाडा जंक्शन: भायखळा येथून मिरवणूक “खडा पारसी” जंक्शनकडे जाते आणि तेथून क्लेअर रोड मार्गे नागपाडा जंक्शन (एस मोहनी चौक) पर्यंत जाते.

नागपाडा जंक्शन ते गोल देवल: नागपाडा येथून, लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक गोल देवळाकडे जाते.

गोल देऊळ ते ऑपेरा हाऊस ब्रिज: गोल देऊळ ते लालबागच्या राजाची मिरवणूक सरदार वल्लभभाई पटेल रोड (एसव्ही रोड) कडेने सीपी टँक, प्रार्थना समाज आणि ऑपेरा हाऊस ब्रिज (वरेरकर पूल) पर्यंत जाते. त्यानंतर मिरवणूक गिरवार चौपाटीवर येते. येथे लालबागच्या राजाची आरती करून गणरायाला निरोप दिला जातो.

लालबागच्या राजाच्या मिरवणूकीमध्ये खास आकर्षण असते  ते म्हणजे दोन टाकी जवळ मुस्लिम बांधव देखील हमखास बाप्पाची तितक्याच आदराने पूजा आणि आरती करतात.  इथे हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती येते.