Kusumagraj Birth Anniversary 2019: विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) हे मराठी भाषेतील प्रख्यात कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक अशी त्यांची ओळख. 27 फेब्रुवारी हा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मायबोली 'मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
पुण्यात (Pune) जन्माला आलेल्या शिरवाडकर यांनी 'कुसुमाग्रज' (Kusumagraj) या टोपणनावाने नेहमी कवितालेखन केले. त्याचसोबत शिरवाडकर यांचे व्यक्तीमत्व सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न म्हणून वर्णन केले जाते. नाशिक येथे शिरवाडकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी.ए. ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी चित्रपटात पटकथा लिहिणे,छोट्या भुमिका साकारणे अशी कामे केली. त्यानंतर स्वराज्य,प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियकतकालिकांचे,वृत्तपत्रांते संपादक म्हणून ही काम केले.
तर कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हे माणसाला सभोवतालच्या परिसराशी संवाद साधण्यास शिकवते.आपल्याला जाणवलेली भावना उत्कटपणे दुसऱ्यापर्यंत उत्तमरित्या पोहचवणे ही मानवी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आयुष्यातील अनुभवांची मांडणी जेव्हा काव्यातील शब्दांमध्ये होते तेव्हा छंद,लय, यमक आणि शब्दांची सामाजिकता यांची प्रक्रिया घडून येते. तसेच शिरवाडकर यांचे आनंद पुस्तक हे काव्याचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले जाते. तर खालील या कविता कुसुमाग्रजांच्या लोकप्रिय आहेत.
>कणा
ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !
- कवी कुसुमाग्रज
>जोगीण
साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन
दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.
तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही
माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.
-कुसुमाग्रज
>आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी
-कुसुमाग्रज
>हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर,
असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला
-कुसुमाग्रज
>माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.
हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.
नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.
हिच्या गगनात घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही,
हिच्या पुत्रांच्या बाहूत,
आहे समतेची ग्वाही.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
मायदेशातील शिळा.
-कुसुमाग्रज
मराठी साहित्यात सकस लेखण करुन त्यात मोलाची भर घालणारा लेखक अशी शिरवाडकरांची खास ओळख. अशा या लोकप्रिय लेखकाचा जन्मदिवसही तितकाच मोठा साजरा केला जावा अशी काही साहित्यिक आणि इतर मंडळींची इच्छा होती.