साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास ( Photo Credits: Facebook)

नवरात्रीच्या (Navratri 2019) निमित्ताने देशभरात स्त्रीशक्तीचा जागर सुरु झाला आहे, स्त्रीरूपी देवीचे पूजन करण्याचा हा खास सोहळा दरवर्षी तितक्याच उत्साहात देशात पार पडतो.नवरात्रीमध्ये अनेक भाविक शक्तिपीठांना आवर्जून भेट देतात. संपूर्ण भारतात 51 शक्तिपीठे आहेत तर यातील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई (Kolhapur Ambabai) , माहूरची रेणुकादेवी (Mahur Renuka) , आणि तुळजापूरची तुळजाभवानी (Tuljapur Tuljabhavani) ही मुख्य तीन शक्तिपीठे आहेत तर वणी ची सप्तशृंगी (vani Saptshrungi) हे अर्धे शक्तीपीठ आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये याठिकाणी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, या ठिकाणची नैसर्गिक संपन्नता आणि शक्तीचा प्रत्यय घडवून देणारी देवीची मूर्ती हा एक सुंदर अनुभव मानला जातो.

शक्तीपीठ नावाचा इतिहास

या देवस्थळांना शक्तीपीठ म्ह्णून का संबोधले जाते असा एक प्रश्न आपल्या सर्वनाही पडला असेल,पुराणातील एक आख्यायिका याबाबत उत्तरं देते.असं म्हणतात पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचा देह हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे 51 तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच 51 शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.यातील साडेतीन तुकडे महाराष्ट्रात पडल्याने महाराष्ट्रात ही साडेतीन शक्तिपीठे आहेत.

यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने चला तर मग महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास जाणून घेऊयात..

कोल्हापूर अंबाबाई

कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी-देवीचा निवास आहे. देवळाची मुख्य वस्तू दोन मजली आहे. यासाठी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. महालक्ष्मीची मूर्ती 11.22 मीटर उंच असून ती एका 0.91 मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

माहूरगड रेणुका माता

श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुका आणि येल्लमा माता ही एकाच देवीची नावे आहेत यामागे एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, ज्यानुसार, एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्निंच्या आशिर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. रेणुका देवीचा मुखवटा सुमारे 5 फूट उंच असून 4 फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे. या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे.

तुळजापूर तुळजाभवानी

श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी म्ह्णून ओळखली जाते. बालाघाटच्या एका कड्यावरील एका गावी तुळजापूर आहे आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा 21 दिवसांचा असतो.

वणीची सप्तशृंगी

सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवीचे माहात्म्य सर्वज्ञात आहे उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.सप्तशृंगीदेवी बरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन असे  महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

या शक्तिपीठांशिवाय भारतातील अनेक राज्यांमध्ये देवींची अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या प्रत्येक मंदिराची एक वेगळी ख्याती आहे. जर का तुम्हाला भटकंतीचे वेड असेल तर सणांच्या निमित्ताने याठिकाणांना भेट देऊन आपण इथला इतिहास जाणून घेऊ शकता.