Gauri Avahan Subha Muhurta (फोटो सौजन्य - File Image)

Gauri Avahan 2024 Subha Muhurta: बाप्पाचं आगमन झाल्यानंतर काही दिवसातचं जेष्ठा गौरीचं (Jyeshtha Gauri) आगमन होतं. ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला होते. यंदा मंगळवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन (Jyeshtha Gauri Avahana 2024) होत आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन (Gauri Pujan) करण्यात येणार आहे. याशिवाय, गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे.

गौरी आवाहन शुभ मुहूर्त -

10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच या दिवशी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, यंदा भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ही 9 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 53 मिनिटांनी सुरु होणार असून 10 सप्टेंबरला रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी सप्तमी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार गौराईचे आगमन हे 10 सप्टेंबरला होणार आहे. (हेही वाचा -Gauri Aagman Rangoli Design: गौरी आगमनाच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, पहा व्हिडिओ)

जेष्ठा गौरी पूजन, विसर्जन शुभ मुहूर्त आणि तिथी -

जेष्ठा गौरी पूजन बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात येईल. तसेच गुरुवार, 12 सप्टेंबर ला ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करण्यात येईल. (हेही वाचा - Gauri Saree Draping: गौराईला साडी कशी नेसावी? पहा साडी नेसवण्याची सोपी पद्धत (Watch Videos))

ज्येष्ठा गौरी आवाहन पूजाविधी -

महाराष्ट्रात वाजत-गाजत ज्येष्ठा गौरीचे आगमन केले जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी माता गौरीला शुद्ध पाणी अर्पण केले जाते. त्यानंतर माता गौरीचे मुखवटे घरात विराजमान झाल्यानंतर गौरी देवीला साडी नेसवून सोळा अलंकार घातले जातात. त्यानंतर गौराईच्या कपाळावर हळद, कुंकुम आणि अक्षत लावल्या जातात. त्यानंतर गौराईची आरती करून नैवैद्य अर्पण केला जातो.

ज्येष्ठा गौरी आवाहन महत्त्व -

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी गणपती आणि माता गौरीची पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांचे कल्याण करण्यासाठी तीन दिवस उपवास करतात. मान्यतेनुसार, या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी, माता पार्वती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर अवतरली होती. या दिवशी श्रीगणेशाप्रमाणेच माता गौरीची मूर्तीही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात घरी आणली जाते. त्यानंतर तीन दिवसांनी गौराईचे विसर्जन केले जाते.