Karmaveer Bhaurao Patil Death Anniversary: कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil). अण्णा. रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) संस्थापक. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेला आधारवड. थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक. ग्रामीण महाराष्ट्रातील शेकडो मुलांच्या, तरुणांच्या मनात शिक्षणाचा स्फुल्लींग पेटवणारा महापूरुष. ज्याने ग्रामीण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असे दृष्टे व्यक्तिमत्व. ज्यांचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना कर्मवीर ही उपाधी बहाल केली. अशा या कर्मवीरांची आज पुण्यथिती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य याबाबतचा अल्पसा दृष्टीक्षेप.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना लोक प्रेमाणे अण्णा म्हणत. पुढे लोक त्यांना कर्मवीर अण्णा म्हणू लागले. कर्मवीर भाऊराव यांचे पू्र्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. जैन कुटुंबात जन्मलेल्या भाऊराव यांच्यावर महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता. या प्रभावातूनच त्यांनी शिक्षणप्रसाराचे कार्य हाती घेतले. त्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तसेच मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजनाही सुरु केली. ही योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये आजही पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर 'कमवा व शिका' योजनेचा लाभ घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षणात मोठी मजल मारल्याचे दिसते.
कर्मवीर भाऊराव पाटील हे जात, धर्मापलीकडे गेलेले व्यक्तीमत्व होते. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे त्यांनी केव्हाच जाणले होते. त्यामुळे त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. संस्थेसाठी देणगी आणि विद्यार्थी मिळविण्यासाठी कर्मवीर महाराष्ट्रभर फिरले. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना समता, बंधुता हे संस्कार दिले. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व जातीधर्माचे विद्यार्थी होते. हे विद्यार्थी आपसांमध्ये बंधुभाव ठेऊन होते. ते आपल्या जेवणासाठी एकमेकांमध्ये मिळूनमिसळून आपले जेवण स्वत:च बनवत. (हेही वाचा, Buddha Purnima 2020: बुद्ध पौर्णिमे दिवशी जाणून घ्या भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज ते ओशो यांचे काय होते विचार)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. सांगितले जाते की भाऊरावांचे घराणे पहिल्यापासून कर्मठ होते. पण, भाऊरावही पहिल्यापासूनच बंडखोर होते. त्यामुळे घरात पाळली जाणारी शिवताशिवत त्यांना अमान्य होती. त्यांनी बंडखोरपणे ती मोडून काढली. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात मोठी चीड होती. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुणे त्यांनी शिक्षण प्रसार सुरु केला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेक विचारवंत, समाजसुधारकांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव केला. 9 मे 1959 या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.