21st Anniversary Kargil Vijay Diwas 2020: 26 जुलै हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने गौरवाचा आणि महत्वाचा दिवस आहे, याच दिवशी 1999 साली भारतीय सैन्याने पाकिस्तानला अक्षरशः गुडघे टेकायला लावलं होतं, कारगिल च्या युद्धात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावल्याचा हा दिन म्हणजेच कारगिल विजय दिवस दरवर्षी अभिमानाने साजरा केला जातो. भारत पाकिस्तान या देशात झालेले हे युद्ध तब्बल 74 दिवस सुरु होते. अखेरीस 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने विजय मिळवला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते. आज या घटनेला 21 वर्ष पूर्ण होत आहेत.यानिमित्त आपण या दिवसाविषयी, कारगिल च्या युद्धाविषयी आणि यात शहीद झालेल्या सर्व शूर जवानांशी संबंधित महत्वाची माहिती पाहणार आहोत.
-कारगिल युद्ध (Kargil War) हे ऑपरेशन विजय (Operation Vijay) या नावाने सुद्धा ओळखले जाते.
-पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारतीय सैन्यावर सर्वात प्रथम हल्ला केला होता. कोलोलिंग हाइट्स, टाइगर हिल व पॉईंट 4875 (बत्रा टॉप) यासहित चार अन्य टोकांवर पाक सैन्याने कब्जा केला होता. पाकिस्तान ला श्रीनगर-लेह राष्ट्रीय राजमार्ग टार्गेट करता येण्यासारखा होता.
- 8 मे 1999 रोजी पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी यांनी कारगिलच्या शिखरांवर कब्जा केला होता, यात एकूण 5000 पाक सैनिक होते.
- ही हालचाल सुरु झाली असताना 3 मे रोजी ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाला बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत असताना संशयास्पद लोक आढळले होते.
-यासंदर्भात माहिती मिळताच तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय ची घोषणा केली. 8 मे रोजी लगेचच हे युद्ध सुरु झाले.
- हे युद्ध 18 हजार फूट उंचीवर लढण्यात आले होते. यात हवाईदलाचा सुद्धा वापर करण्यात आला होता.
- भारतीय सैन्याकडून बोफोर्सने हल्ला बोल केला जात असताना वायुसेनेच्या मिग-27 आणि मिग-29 च्या माध्यमातून हल्ला चढवण्यात आला होता.
-कारगिलच्या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला यामध्ये सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले. कारगिल युद्धातील शहीद जवानांची यादी पहा.
- या युद्धाच्या दरम्यान तब्बल 2 लाख 50 हजार स्फोटकांचा हल्ला झाला होता. 5 हजार बॉम्ब फेकण्यात आले होते, 300 हुन अधिक तोफा आणि रॉकेट लॉन्चर वापरण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक झाली होती.
- या युद्धात पाकिस्तान च्या सेनेतील सेनेच्या 3 हजार जवानांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातले होते.
दरम्यान या युद्धात भारतीय सैन्यावर अधिक दबाव होता याचे कारण असे की पाकिस्तानी सैन्य हे पहाडाच्या टोकावरून हल्ला करत होते तर भारतीय सैन्य हे खोऱ्यातून वर हल्ला करत होते. तरीही आपले प्रदेश पुन्हा ताब्यात घेऊन भारतीय सैन्याने 26 जुलै रोजी LOC लागत पुन्हा एकदा विजयी पताका रोवली.