
Jara Jivantika Puja TimeTable and Importance: अगदी काही दिवसांची श्रावणाला सुरुवात होणार असून श्रावणात येणा-या सणांसाठी, व्रतवैकल्यांसाठी एव्हाना महिलांची लगबग सुरु झाली असेल. श्रावणात प्रत्येक वाराला विशेष असे महत्व आहे. श्रावणात श्रावणी सोमवार जितका महत्त्वाचा आहे तितकाच श्रावणी शुक्रवारही. आपल्यापैकी किती जणांना माहित असेल सांगता येणार नाही. पण श्रावण महिन्यात शुक्रवारी जरा जिवंतिका देवीची पूजा केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणारी देवी म्हणून जरा जिवंतिका देवीची श्रावणात विशेष पूजा केली जाते. तसेच आपल्या अपत्याला म्हणजेच आपल्या बाळाला भरपूर आयुष्य मिळावे यासाठीही ह्या देवीची आराधना केली जाते.
श्रावणातील 4 श्रावणी शुक्रवार केले जाणारे जरा जिवंतिका देवीचे पूजन यंदा कधी करावे, तसेच या दिवसाचे विशेष महत्त्व आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
यंदा कधी कराल जरा जिवंतिका देवीचे पूजन:
यावर्षी ऑगस्ट महिना म्हणजे श्रावण महिना. त्यानुसार, 2, 9,16, 23 आणि 30 ऑगस्ट या 5 श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका देवीची पूजा करता येईल.
या दिवसाचे विशेष महत्व:
जरा जिवंतिका देवी ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे. पुराणात असे सांगितले आहे की, जरा ही मूळची राक्षसीण होती. ती मगध देशांत वास्तव्यास होती. मगध मधील नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. त्यामुळे त्याला जन्मताच नगराबाहेर फेकून देण्यात आले. यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाच्या शरीराचे जे दोन भाग झाले होते ते जुळवले आणि त्याला जीवदान दिले. तो बालक 'जरासंध' म्हणून ओळखले जाऊ लागले. मग पुढे जाऊन मगध देशात जरा राक्षसीनेचा मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. तेथील लोक तिला सर्व मुलांची आई समजू लागली. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तिची पूजा करु लागले.
महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी.
हेही वाचा- Deep Amavasya 2019: दीप अमावस्या का आणि कशी साजरी करतात?
ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.
आपल्या बाळाचे रक्षण व्हावे यासाठी हिंदू स्त्रिया जरा जिवंतिकेची मनोभावे पूजा करतात. या देवीचे पूजा केल्याने जरा जिवंतिका देवी आपल्या बाळावर प्रसन्न होऊन त्याचे रक्षण करेल, अशी महिलांची श्रद्धा आहे.