International Workers' Day 2025 Wishes

International Workers' Day Wishes in Marathi: दरवर्षी 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers’ Day 2025) साजरा होतो. हा दिवस कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा एक जागतिक उत्सव आहे. हा दिवस कामगारांच्या एकजुटीचे, त्यांच्या मेहनतीचे आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. 19व्या शतकातील कामगार चळवळींपासून ते आजच्या जागतिक आव्हानांपर्यंत, हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची मुळे 19व्या शतकातील अमेरिकेतील कामगार चळवळींमध्ये आहेत. 1886 मध्ये, अमेरिकेतील शिकागो शहरात सुमारे 400,000 कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या दिवसासाठी शांततापूर्ण निदर्शने केली.

त्या काळात, कामगारांना 12 ते 16 तास काम करावे लागत असे, आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता किंवा योग्य वेतन यांचा अभाव होता. 1 मे 1886 रोजी सुरू झालेली ही मोहीम 4 मे रोजी हेमार्केट स्क्वेअर येथे हिंसक बनली, जेव्हा अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉम्ब फेकला, ज्यामुळे सात पोलीस आणि किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेला ‘हेमार्केट प्रकरण’ म्हणून ओळखले जाते, आणि ती कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक बनली.

पुढे 1889 मध्ये, युरोपातील समाजवादी पक्ष आणि कामगार संघटनांच्या जागतिक संघटनेने, हेमार्केट प्रकरणातील शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित केला. या निर्णयामुळे जगभरातील कामगार चळवळींना बळ मिळाले, आणि हा दिवस आठ तासांचा कामाचा दिवस, योग्य वेतन आणि सुरक्षित कामाच्या परिस्थितींसाठीच्या लढ्याचे प्रतीक बनला. 1892 मध्ये, अमेरिकेत सार्वजनिक कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा कायदा लागू झाला, आणि हळूहळू जगभरातील अनेक देशांनी हा नियम स्वीकारला.

या दिवसाचे औचित्य साधत खास मराठी Messages, Images, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा.

दरम्यान, भारतात आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा प्रारंभ 1923 मध्ये तत्कालीन मद्रास (आता चेन्नई, तमिळनाडू) येथे झाला, जिथे मजूर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानने पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. या पक्षाचे संस्थापक मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार यांनी त्रिप्लिकेन बीच आणि मद्रास उच्च न्यायालयासमोरील किनाऱ्यावर दोन सभा आयोजित केल्या. त्यांनी सरकारला 1 मे हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आणि भारतात प्रथमच लाल झेंडा वापरला, जो कामगार एकजुटीचे प्रतीक आहे.

आज, भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषत: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये, 1 मे हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा दिवस अनुक्रमे महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणूनही साजरा केला जातो, कारण 1960 मध्ये या दोन राज्यांची स्थापना झाली. भारतात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष या दिवशी रॅली, सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात, ज्यामुळे कामगारांच्या समस्यांवर प्रकाश टाकला जातो आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो.