हिंदू संस्कृतीमध्ये फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा महत्वाचा सण म्हणजे होळी (Holi 2021) म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. यंदा रविवार 28 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे व सोमवार, 29 मार्च रोजी धुळवड खेळली जाणार आहे. यादिवशी महाराष्ट्रात समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. तसेच महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमीचा उत्सव साजरा होतो. यंदाच्या होळी दिवशी ग्रहांचा योग अतिशय शुभ असणार आहे.
यावर्षी प्रदोष काळमध्ये होळी दहन शुभ मानले जाईल. यंदा होळी दहन दरम्यान वृध्दी योग आहे. हा योग सर्व शुभ कार्यात वाढ आणि प्रगती करत राहील. तसेच होळीच्या दिवशी सकाळपासून ते दुसर्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत सर्वार्थासिद्धी योग असेल. यावेळी शुभ कार्य करणे फायद्याचे ठरणार आहे. मीनमध्ये सूर्याचे असणे व मंगळचे वृषभमध्ये असणे देशाच्या आर्थिक बाबीसाठी फलदायी ठरणार आहे.
अशी असेल ग्रहांची स्थिती –
या वर्षीच्या होळीला मंगळ आणि राहू हे वृषभ राशीत असणार आहेत. गुरु व शनी मकरमध्ये असणार आहेत. केतु वृश्चिकात आहे. बुध कुंभात प्रवेश करत आहे, मीन राशीत सूर्य व शुक्र एकत्र असणार आहेत. तसेच चंद्राचा कन्या राशीतील प्रवेश आणि केतुचे वृश्चिक राशीत असणे मोक्षदायी आहे. हे सर्व ग्रहांचे योग अतिशय शुभ असून यादिवशीच्या पूजा अर्चनेमुळे मनातील इच्छा पूर्ण होतील असे सांगितले आहे.
होळीचा सण उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी पूतना राक्षसीणीला जाळण्यात आले, म्हणून उत्तर भारतीय लोक होळी हा पुतना राक्षसीणीला जाळून साजरा करतात. दक्षिण भारतात होळी हा सण हा प्रामुख्याने काम देवासाठी साजरा केला जातो. महाराष्ट्रात, भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन त्याची आत्या होलीकाने अग्निकुंडामध्ये प्रवेश केला होता अशी आख्यायिका आहे. (हेही वाचा: Holi 2021 Date: यंदा कोणत्या तारखेला आहे होळी? कधी कराल होलीका दहन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व)
अशाप्रकारे, दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. भारतात अनेक ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिबाशी रंगपंचमी खेळली जाते. महाराष्ट्रात हा उत्सव शिमग्यानंतर पाच दिवसांनी असतो. फाल्गुन पंचमी म्हणजे श्री कृष्ण पंचमी या दिवशी भगवान श्रीकृष्ण हे गोकुळातील गोपी तसेच सर्व स्त्रिया, पुरुष यांना एकत्र आणून त्यांच्या सोबत रंगपंचमी खेळायचे.