Holi 2020 Skin Care Tips: धुळवड, रंगपंचमी दिवशी होळीच्या रंगांत माखण्यापूर्वी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी नक्की कराच!
Representational Image (Photo Credits: File Image)

वसंत ऋतूच्या आगमनाने जसे निसर्गात नवनवे रंग भरले जातात. तसेच होळी आणि धुळवडीच्या सणाच्या माध्यमातून रंगोत्सवाचा खेळ खेळला जातो. यंदा 9 मार्च दिवशी होलिका दहन आणि 10 मार्च दिवशी धुळवड खेळली जाणार आहे. दरम्यान या सणामध्ये पाण्याचे फुगे, रंगांची उधळण करून सण साजरा करण्याची पद्धत आहे. मात्र या सणाचा बेरंग होणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. होळीनिमित्त खेळल्या जाणा-या रंगांमध्ये पुरेशी काळजी न घेतल्यास त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. . रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच होळी खेळताना केसांची आणि त्वचेची नेमकी कशी काळजी घ्यावी यासाठी या काही खास टीप्स लक्षात ठेवा. होळीच्या रंगात माखण्यापूर्वीच या गोष्टी केल्यास तुमच्या त्वचेचं आणि केसांचं नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते. मग पहा काय आहेत डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन डॉ रिंकी कपूर यांचा सल्ला. नक्की वाचा: Holi 2020: होळीचे रंग त्वचा आणि केसांमधून काढण्यासाठी 'या' घरगुती पद्धतींचा करा वापर, जाणून घ्या Home Remedies

होळीच्या रंगापासून त्वचेचं नुकसान कसं टाळाल?  

  • त्वचेला कोरडे ठेवू नका :

कोरड्या त्वचेचा अर्थ म्हणजे त्वचेवरील खुले छिद्र. याचाच अर्थ रंगामध्ये असलेली रासायनिक द्रव्ये ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रंग खेळण्यापुर्वी त्वचेवर मॉईश्चरायझर तसेच सनस्क्रीन लावा. बाहेर पडण्यापूर्वी कमीतकमी एक तास आधी सनस्क्रीन लावा. याकरिता तुम्ही मोहरीचे तेल, नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. चेह-यासाठी एरंडेल तेलाचा वापर करु शकता. प्रामुख्याच्या कानाच्या मागील बाजूस, कानाच्या पाळीजवळ तसेच नखांवर तेल लावण्यास विसरु नका कारण याठिकाणी रंग सहजपणे टिकून राहण्याची शक्यता असते.

  • केसांना तेल लावा :

आपल्या केसांना टाळूपासून मुळांपर्यंत छान तेलाची मालीश करा. केसांना होणारी इजा रोखण्याकरिता तेल लावणे गरजेचे आहे. कोरफडीच्या गरामध्ये काही प्रमाणात नारळाचे तेल मिसळून ते देखील डोक्याच्या त्वचेला तसेच केसांना लावू शकता.

  • सनस्क्रीनचा वापर करा:

खेळायला जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावून मगच घराबाहेर पडा. यामुळे टॅनिंगला प्रतिबंध करता येईल

पेट्रोलियम जेलीचा वापर करा - ओठ, नखे आणि डोळे यांच्या संरक्षण हे अतिशय महत्त्वाचे असून याकरिता तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. चांगल्या प्रतीच्या लिप बामचा वापर करा. जेल वापरुन आपल्या नखांच्या कडा डोळ्याभोवती आणि डोक्याभोवती तसेच डोळ्यांच्या पापण्या नुकसान होण्यापासून वाचवा.

  • नेल पेंटचा वापर करा :

नखांवर नेल पेंटचा जाड थर लावा. आकर्षक रंगाचा वापर करून नखांचे संरक्षणाबरोबरच सौदर्यातही भर घालता येईल.

कृत्रिम रंगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय –

नैसर्गीक रंगांचा वापर करा

- त्वचा हायड्रेट करा: ठराविक अंतराने भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या

- जास्त काळ ओल्या कपड्यांमध्ये राहू नका. शक्य तितक्या लवकर ओले कपडे बदला.

- डोळ्यांना रंग आणि सूर्यापासून वाचवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा

- वॉटरप्रूफ बँड-एडद्वारे सर्व जखमा बंद करून ठेवा जेणेकरून त्यामध्ये रंग तसेच हानीकारक रसायने जाऊन संसर्ग होणार नाही.

- केस मोकळे सोडू नका - आपले केस वर बांधा किंवा त्यास स्कार्फने बांधा

होळीच्या रंगांंमुळे त्वचेला त्रास होत असल्यास काय कराल? 

- खाज सुटणे, जळजळ यांसारख्या त्वचेला त्रास देणार्‍या समस्यांवर तत्काळ उपचार झाले पाहिजेत. त्वचेवरील कोणताही रंग किंवा पेंट तत्काळ थंड पाण्याने धुऊन टाकावा. योग्य उपचार मिळावेत यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना किंवा डर्माटोलॉजिस्टना दाखवले पाहिजे.

- लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावित जागी कोर्टिकोस्टेरॉईड ऑईंटमेंट लावणे

- त्वचा बरी करण्यासाठी अ‍ॅन्टीबायोटिक  किंवा अँटिफंगल औषधे घेणे

- त्वचेचा शुष्कपणा कमी व्हावा म्हणून काही आरामदायी ऑईंटमेंट्स त्वचेला लावणे

- कोणतेही तीव्र रंग नसलेल्या सौम्य साबणाने त्वचा धुणे

- प्रादुर्भाव तीव्र असेल तर तोंडावाटे घेण्याची औषधेही दिली जाऊ शकतात.

- नियमित पाणी व फळांचे रस प्या.

- भरपूर पाणी वापरून चेहरा आणि अंग धुऊन काढावे.

- बेबी ऑईलचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी.

- रंग खेळल्यानंतर किमान 48 तास त्वचा घासू (स्क्रबिंग) नये.

- त्वचा मऊ ठेवण्यासाठी दही किंवा बेसनासारखे नैसर्गिक घटक वापरावेत.

- अंघोळ झाल्यानंतर संपूर्ण अंगाला मॉयश्‍चरायझर लावून त्यातील आर्द्रता कायम राहील याची खात्री करावी.

- हे सोपे उपाय केलेत तर होळीचा आनंदही लुटता येईल आणि त्वचा निरोगी व मुलायम राखता येईल.

 

यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने अनावश्यक गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही यंदा होळी, धुळवड किंवा रंगपंचमीच्या निमित्ताने मोठ्या होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार असाल तर खबरदारीचे उपाय घेऊनच या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हा. कृत्रिम रंगांमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करा.