Shahi Snan at Kumbh Mela (Photo credits: Facebook/DY365)

हरिद्वारमधील महाकुंभ मेळा उत्सव (Haridwar Kumbh Mela) 2022 मध्ये नव्हे तर 2021 मध्ये आयोजित केला जात आहेत. परिषदेच्या बैठकीत विचारमंथनानंतर हा निर्णय घेण्यात आला. ग्रहांचा योग 2021 मध्ये बनत असल्याने हा निर्णय घेतला गेला. मेष राशीत सूर्य आणि कुंभ राशीत बृहस्पति असताना हरिद्वारमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो. 2022 मध्ये बृहस्पति कुंभात राहणार नाही, म्हणून उज्जयनी विद्वान परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून सन 2021 मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे अध्यक्ष (एबीएपी) महंत नरेंद्र गिरी यांनी जाहीर केले की, यंदा हरिद्वार कुंभातील पहिले 'शाही स्नान' 11 मार्च रोजी 'महाशिवरात्री'च्या दिवशी होईल.

ग्रहांच्या स्थितीमुळे हा उत्सव 12 ऐवजी 11 व्या वर्षी घेण्यात आला आहे, म्हणून या वेळी कुंभमेळ्याचा कालावधी 120 दिवसांवरून 48 दिवसांवर करण्यात आला. गंगेबद्दल श्रद्धा आणि आदराने भरलेले कुंभ वर्ष आजपासून सुरू होत आहे. यावर्षी भारत आणि परदेशातून भाविक हरिद्वारात अमृत गंगा स्नान करण्यासाठी दाखल होतील. अशाप्रकारे वर्षाचे मुख्य आकर्षण शतकातील दुसरे पूर्ण कुंभ असेल. सूर्य दरवर्षी 14 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करतो, तर प्रत्येक बारा वर्षानंतर बृहस्पति कुंभात येतो. यावेळी अकराव्या वर्षी पाच एप्रिलला हा योग येत आहे.

मेळ्यातील पहिले शाही स्नान 11 मार्च शिवरात्रि दिवशी, दुसरे शाही स्नान 12 एप्रिलला सोमवती अमावस्या दिवशी आणि तिसरे मुख्य शाही स्नान 14 एप्रिल मेष संक्रांती रोजी होणार आहे. तिन्ही तिथींना सर्व तेरा आखाडे स्नान करतील. चौथे शाही स्नान 27 एप्रिल रोजी बैशाख पौर्णिमेला होणार आहे. परंतु त्या दिवशी संत आखाडे स्नान करत नाहीत. (हेही वाचा: नववर्षामध्ये होळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी ते दसरा कधी? जाणून घ्या महत्त्वाच्या सणांच्या सुट्ट्यांच्या तारखा!)

कुंभमेळ्याला येणाऱ्या प्रवाशांना नोंदणीनंतरच कुंभमेळा क्षेत्रात प्रवेश करता येईल. कुंभमेळ्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यास सुरवात झाली आहे. सध्या हरिद्वारमध्ये 1073 पोलिस कर्मचारी आणि दोन कंपनी पीएसी तैनात आहेत. आता 1 जानेवारीपासून अतिरिक्त सैन्य तैनात होणार आहे. दरम्यान, कुंभमेळा उत्सव हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे कोट्यावधी भाविक कुंभमेळा उत्सवात स्नान करतात. या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाराव्या वर्षी आणि प्रयागमध्ये दोन कुंभउत्सवाच्या सहा वर्षांच्या अंतरावर अर्धकुंभ मेळा भरतो.