Happy Holi 2019: होळी, रंगपंचमी साठी नैसर्गिक रंग घरच्या घरी कसे बनवाल?
Holi 2019 (Photo Credits: Wikimedia Commons)

होळीचा कलरफुल सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी म्हणजे पूजा, पुरळपोळी, बोंबा आणि रंगाची लयलूट करण्याचा हा सण. आनंदी, उत्साही अशा या सणात रंगाची उधळण करत सारेच विविध रंगात न्हाऊन निघतात. मात्र काळानुसार आपली मुळ परंपरा जपत आपण सण साजरे करण्याच्या पद्धतीत काही बदल केला. म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडे रंग खेळणे किंवा केसांचे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करणे, इत्यादी. पण हे बदल नक्कीच पर्यावरणस्नेही आणि आपल्या फायद्याचे आहेत. कारण बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे त्वचा, केस त्याचबरोबर आरोग्याला देखील हानी पोहचते. तर त्वचा विकार उद्धवण्याचीही शक्यता असते. म्हणून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नैसर्गिक रंग बनवा आणि होळीचा आनंद लूटा.... रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

जाणून घेऊया नैसर्गिक रंग बनवण्याची पद्धत:

पिवळा रंग:

# झेंडूची फुलं किमान सहा ते सात तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. पिवळ्या रंगाचे पाणी तयार होईल. मग पिचकारी, फुग्यात तुम्ही ते वापरु शकता.

# कोरडा पिवळा रंग तयार करण्यासाठी हळदीचा वापर करा. हळद औषधी असल्याने त्वचेचे रक्षण होईल. हळदीच्या दुप्पट बेसन किंवा मुलतानी माती घालून पिवळा रंग तयार करा. हा लेप त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

# मैदा आणि हळद त्यात थोडं पाणी घालून मिक्स केल्याने तुम्हाला पिवळा रंग मिळेल.

हिरवा रंग:

# पालक, कोथिंबीर यापासून किंवा कडुलिंबाची पाने, हिना पावडर याचा वापर करुन तुम्ही हिरवा रंग तयार करु शकता.

# पालकाची प्युरी करुन किंवा कडुलिंबाचा पाला वाटुन तो गाळून घ्या व हे पाणी मुलांच्या पिचकारी, फुग्यामध्ये भरुन द्या. कडुलिंब जंतूनाशक असल्याने या पाण्याचा फायदाच होईल.

# कोरडा हिरवा रंग म्हणून तुम्ही हिनाची सुकी पावडर वापरु शकता किंवा पाण्यात टाकूनही त्याचा वापर करु शकता. मात्र हिनाची सुकी पावडर त्वचेवरुन पटकन निघते. पण पाण्यात टाकून वापरल्याने रंग शरीरावर राहू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक त्याचा वापर करा.

# मैद्यात हिरवा फूड कलर आणि पाणी घालून तुम्ही हिरवा रंग बनवू शकता. तुम्हाला फुड कलर वापरायचा नसल्यास तुम्ही पुदिना किंवा पालकाचा रस वापरु शकता.

गुलाबी रंग

# किसलेलं बीट पाण्यात टाकून तुम्ही गुलाबी रंग मिळवू शकता.

# मैदा-बिटाचा रस मिक्स करुन त्यात थोडं पाणी घाला. तुम्हाला गुलाबी रंग मिळेल.

नारंगी रंग

# डाळिंबाची साल गरम सात–आठ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून वापरा.

# पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून किंवा पळसाची फुलं गरम पाण्यात उकळूनही देखील तुम्ही ते पाणी वापरू शकता.

काळा रंग

# बाजारात मिळणारा काळ्या रंगात घातक पदार्थ, केमिकल्स असतात. त्यामुळे त्वचा, अवयव यांना अपाय होऊ शकतो. म्हणून नैसर्गिक पद्धतीने काळा किंवा राखाडी रंग मिळवण्यासाठी आवळ्याचा वापर करा.

# आवळ्याची पुड सात–आठ तास लोखंडी भांड्यात किंवा कढईत भिजवून ठेवल्यास तुम्हाला काळा रंग मिळू शकतो.

# काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी गाळून वापरा.

लाल रंग

# रक्तचंदनाच्या पावडरपासून तुम्ही लाल रंग अगदी सहज मिळवू शकता.

# जास्वंदाची फुलं सावलीत सुकवा आणि त्याची पावडर करून पिठात मिसळून वापरा.

# टोमॅटो व गाजराचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी वापरा.

चॉकलेटी रंग

# चॉकलेटी रंग बनवण्यासाठी तुम्ही खायच्या पानांत वापरली जाणारी कात वापरु शकता.

# चहा किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड करुन त्याचे पाणी तुम्ही वापरू शकता.

# मैद्यामध्ये चॉकलेटी फूड कलर आणि थोडं पाणी घालून तुम्ही चॉकलेटी रंग मिळवू शकता.

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने होळीचे नैसर्गिक रंग बनवू शकता. तर मग यंदाच्या होळीला तुम्हीही हे रंग घरी बनवू बघा. हे रंग नैसर्गिक, केमिकल विरहीत असल्याने यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. तर मग यंदाच्या होळी रंगा या नैसर्गिक रंगात....