Father’s Day 2019: असे म्हणतात, आई आपल्या बाळाला जगात आणते, तर वडील आपल्या मुलाला जग दाखवतो. त्यामुळे आपल्या जन्मात, जडणघडणींत जेवढा आईचा वाटा असतो तितकीच वडीलही आपल्या मुलांसाठी महत्त्वपुर्ण अशी भूमिका बजावतात. आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात ठेवते तर वडील आपल्या मुलाला नेहमी डोक्यातच ठेवतात. म्हणजेच त्याच्या भविष्यासाठी तरतूद करण्याची तयारी हा प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या जन्माआधीपासून करायला सुरुवात करतो. मात्र अनेकदा आईच्या अफाट प्रेमामुळे वडीलांचे हे प्रेम आपल्या दृष्टीसच येत नाही. अशा या वडीलांचा विशेष सन्मान करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. या वर्षी हा 'जागतिक पितृदिन' 16 जूनला साजरा केला जाणार आहे. हा दिवस कसा उदयास आला,या दिवसामागचे विशेष महत्त्व काय चला जाणून घेऊयात...
'फादर्स डे' चा इतिहास:
फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.
अशी मिळाली या दिवसाला मान्यता
असे सांगितले जाते की, 1916 मध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्रपती वुडरो विल्सन ने ह्या दिवसाला जागतिक स्तरावर साजरा करण्याची मान्यता दिली होती. त्यानंतर 1924 मध्ये राष्ट्रपती कॅल्विन कुलिज ने ह्याला एक राष्ट्रीय आयोजन घोषित केला. त्यानंतर 1966 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती लिंडन जॉनसन ने जूनच्या तिस-या रविवारी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 1972 मध्ये राष्ट्रपती रिचर्ड निक्सन ने पहिल्यांदा या दिवसाला अधिकृतरित्या साजरा करण्याची घोषणा केली.
Father's Day Special Songs: वडिलांच्या निस्सीम प्रेमाची, त्यागाची महती सांगणारी '5' उत्कृष्ट गाणी
काय आहे या दिवसाचे महत्त्व?
जगातील प्रत्येक आईप्रमाणे वडिलांनाही सन्मान देण्याचा आणि ते आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. या दिवशी मुलं आपल्या वडीलांसाठी खास सरप्राइज प्लान करतात. त्यांना भेटवस्तू देतात. थोडक्यात आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात. ब-याचदा मुलं जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मोकळेपणाने प्रकट करतात तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही. कदाचित बाबांविषयी असणारी भीती हे त्यामागचे कारण असू शकते. मात्र या दिवशी तुम्ही बाबांविषयी असणा-या तुमच्या भावना अगदी खुलेप्रमाणे व्यक्त करु शकतात. म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे.
कुटूंबाचा आधारस्तंभ असलेल्या, संयमशील, वेळेस तितकेच कठोर होणा-या तमाम पित्यांना जागतिक पितृदिनाच्या लेटेस्टली मराठी कडून खूप सा-या शुभेच्छा.