भारतामध्ये दरवर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas 2022) म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतातील सर्व देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 1999 साली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये कारगिल युद्ध झाले, जे सुमारे 60 दिवस चालले आणि 26 जुलै रोजी ते संपले, त्यात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
1999 मध्ये पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिक गुप्तपणे कारगिलच्या डोंगरात घुसले होते. या घुसखोरीच्या विरोधात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय' सुरू केले आणि यातील प्रत्येक घुसखोराला ठार केले किंवा त्यांना पळून जाण्यास भाग पाडले. 26 जुलै 1999 हा तो दिवस होता जेव्हा भारतीय लष्कराने कारगिलच्या टेकड्या घुसखोरांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त केल्या आणि ऑपरेशन विजय पूर्ण यशस्वी घोषित करण्यात आले.
कारगिल युद्धाला 23 वर्षे झाली आहेत. या वर्षी आपण कारगिल विजय दिवसाचा 23 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या दिवसाचे औचित्य साधून खास Messages, Wishes, Greetings, Images शेअर करून करा त्या शूर योद्धांचे शौर्य आणि त्यागाचे स्मरण, ज्यांनी या युद्धामध्ये देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
दरम्यान, कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून 205 किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता होय. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत.
ऑक्टोबर 1998 मध्ये मुशर्रफ यांनी कारगिल योजनेला मंजुरी दिली. कारगिलच्या उंच टेकड्या पाकिस्तानी सैनिकांनी काबीज केल्या होत्या. दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या कारगिल युद्धात अंदाजे 527 भारतीय जवान शहीद झाले, तर 1,300 हून अधिक जखमी झाले.