
Gudi Padwa 2019: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदु धर्मियांच्या वर्षातील पहिला सण आणि नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरण लावून पूजा विधीसह घरोघरी गुढी उभारली जाते. तर दृष्ट प्रवृत्तींच्या राक्षसाचा वध करुन भगवान श्रीराम अयोध्येत परत आले तो हाच दिवस. तसेच ब्रम्हदेवाने सृष्टीची याच दिवशी निर्मिती केली असे मानले जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज आणि प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी या लहरींमधून प्राप्त होणारे चैतन्य अधिक काळ टिकवणारे असते. तर गुढी उभी करताना ती दरवाज्या बाहेरील बाजूस उभारावी. तर जाणून घेऊया गुढी पाडव्याला गुढीची पूजा करण्याचे महत्त्व आणि कशी उभारावी.(हेही वाचा-Gudi Padwa 2019: गुढीवरील रेशमी वस्त्र, कलश, कडूलिंब आणि इतर गोष्टींमागील महत्त्व आणि अर्थ काय?)
-गुढी उभारताना सर्वप्रथम अंगण/घरासमोर रांगोळी काढून ते सुशोभित करावे. तसेच गुढी ज्या ठिकाणी उभारणार असाल त्या ठिकाणी स्वस्तिकचे चिन्ह काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
-गुढी उभी करताना ब्रम्हांडामधील शिव-शक्तींच्या लहरींना आवाहन करुन तिची स्वास्तिकावर उभारणी करावी. त्यामुळे गुढीच्या वरील बाजूस असलेल्या घटकांना देवत्व प्राप्त होते.
-जमिनीवर गुढी उंबरठ्यालगत थोडीशी झुकलेल्या अवस्थेत उभी करावी.
-तसेच आंब्यांची पाने गुढीच्या टोकाला बांधली जातात. तर आंब्यांच्या पानामध्ये जास्त सात्विकता असल्याने ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते.
-त्याचसोबत गुढीला कडुलिंबाची माळ घालावी. तर कडुलिंबांच्या पानामध्ये प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण असतात.
-मात्र गुढी उभारताना साडी आणि कलश सुद्धा असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होते.
-गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी प्राप्त केल्या जातात.
गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते.