चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात. या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याची साग्रसंगीत पूजा केली जाते. गुढी हे आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे, संपन्नतेचे आणि समाधानाचे प्रतिक असते. त्यामुळे पूर्वी गावी मोठमोठ्या गुढ्या उभारल्या जायच्या. अजूनही गावी उंचच उंच गुढ्या उभारण्याची प्रथा आहे. मात्र शहरांमध्ये जागेअभावी उंच गुढ्या उभारता येत नाहीत. अशावेळी आपल्या सोयीनुसार, जागेनुसार गुढी उभारली जाते. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
गुढी उभारताना काठी, रेशमी वस्त्र, कडूलिंब, बत्ताशाची माळ याचा वापर केला जातो. मात्र गुढी उभारताना नेमक्या याच गोष्टी का वापरल्या जातात? तर मग जाणून घेऊया गुढीतील प्रत्येक गोष्टीचं महत्व आणि अर्थ....
रेशमी वस्त्र:
गुढी उभारताना प्रत्येकजण वेगवेगळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचा वापर करतात. हे रंग आपले जीवन फुलवतात. प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट रंगाचे खास महत्त्व असते. या रंगाची आठवण करुन देण्यासाठी रंगीत रेशमी वस्त्राचा वापर केला जातो.
कडूलिंब:
हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश केल्यानंतर गुढीपाडवा हा सण येतो. होळीपासूनच वातावरणात बदल होऊ लागतात. या बदलत्या वातावरणाचा निश्चितच आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात विविध आजार उद्भवण्याची शक्यता बळावते आणि या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला कडूलिंबाची कटू चव घेतली जाते. असा करा कडूलिंबाचा प्रसाद
बत्ताशांची माळ:
नववर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी बत्ताशांची माळ गुढीवर चढवली जाते. आपल्या प्रत्येकाचे आयुष्य हे कटू-गोड आठवणींचे, अनुभवांचे मिश्रण असते. आपल्या आयुष्यातील गोडव्याचे प्रतिक म्हणून बत्ताशांची माळ असते. सुरुवात गोड झाली तर शेवटही गोडच होईल. या उद्देशाने नववर्षाच्या सुरुवातीला गोड खाल्ले जाते.
कलश:
गुढीवर तांब्या उलटा जमिनीच्या दिशेने तोंड करुन ठेवला जातो. जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी, हा यामागील उद्देश असतो. तांब्यावर काढलेले जाणारे स्वस्तिक हे शुभतेचे आणि चौफेर प्रगतीचे प्रतिक मानले जाते. तसंच गुढी पुढे ठेवला जाणारा कलश हा शुभतेचे, मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते.
हार:
पूजा करताना हार गुढीला हार घातला जातो. हार हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते.
गुढी पूर्णपणे सजवून उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन या गुढीला हळद, कुंकू, अक्षता, हार, फुलं वाहून पूजा करतात. त्यानंतर कडूलिंब-साखरेचा प्रसाद खाल्ला जातो. गुढीला गोडाचे नैवेद्य दाखवले जाते आणि सुर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवली जाते.