चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा सण म्हणजे गुढीपाडवा. पाडव्यापासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासोबतच गोडाचे जेवण, शोभायात्रा याचा उत्साह असतो. नववर्षाची सुरुवात अगदी प्रसन्न वातावरणात आणि जल्लोषात केली जाते. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणारा यंदाचा गुढी पाडवा कधी आणि शुभ मुहर्त याबद्दल अधिक जाणून घ्या
आपल्याकडे प्रत्येक सण साजरा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. सणानिमित्त विविध प्रथा पाळल्या जातात. गुढीपाडव्या निमित्त आपल्याकडे कडुलिंब खाण्याची प्रथा आहे. पण नववर्षाच्या सुरुवातीला आणि आनंदी वातावरण असताना कडुलिंबाची कटुता कशाला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याच्या प्रथेचे महत्त्व...
गुढीपाडव्याला कडूलिंब का खातात?
होळीचे दहन झाल्यानंतर वातवरणात उष्णता वाढू लागते. या बदलत्या वातावरणात कांजण्या, गोवर यांसारखे त्वचा विकार, पोटाचे विकार, सर्दी-खोकला यांसारखे आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडूलिंब खावून करतात.
कडूलिंबाचे औषधी गुणधर्म:
# कडूलिंबातील 'प्रोटिन' घटकांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर रोगापासून बचाव होतो.
# कडूलिंबातील अॅन्टीवायरल, अॅन्टीबॅक्टेरियल व अॅन्टीफंगल गुणधर्मामुळे त्वचाविकार आणि जंतूसंसर्गापासून बचाव होतो.
# कडुलिंबाच्या सेवनाने साखर व इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मधुमेहींना मदत होते.
# केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कडूलिंब गुणकारी ठरते.
पाडव्याला कडूलिंब कसा खाल?
कडूलिंब कडू असल्याने त्याचा पाला चविष्ट करुन आपण कडूलिंबाचा आस्वाद घेऊ शकतो. त्यासाठी कोवळ्या कडूलिंबाच्या पानाचे बारीक तुकडे करून त्यात मिरपुड, हिंग, मीठ, गुळ, खोबर्याचा किस, जिरे व थोडा कैरीचा किस एकत्र करून खा.