Ganeshotsav 2020: यंदा गणेशोत्सव हरितालिका, ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन कधी? जाणून घ्या तारखा!
Devi Gauri (Photo Credits-Facebook)

विघ्नहर्ता गणरायाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा धुमधडाक्यामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा होत नसला तरीही घरातल्या घरात आता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. 22 ऑगस्टला गणरायाचं (Ganpati) तर 25 ऑगस्ट दिवशी ज्येष्ठा गौरीचं आगमन (Gauri Avahan) होणार आहे. यंदा अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याने ऋषिपंचमी (RishiPanchami), हरतालिका (Hartalika) हे गणेशोत्सवा दरम्यानचे सण देखील अनेकांना सामुहिकरित्या साजरे न करता घरीच राहून करावे लागणार आहेत. मग जाणून घ्या यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये कोणता सण कधी साजरा केला जाणार आहे? Ganpati Invitation 2020 Marathi Messages Format: बाप्पाच्या दर्शनाला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत निमंत्रण देण्यासाठी खास आमंत्रण पत्रिका.

गणेशोत्सवाची सुरूवात हरितालिकेच्या व्रताने केली जाते. त्यानंतर गणरायाचं आगामन होते. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन, ऋषिपंचमी, गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी पूजन आणि नंतर 5 दिवसांच्या, 6 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. काही घरांमध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये 10 दिवस गणराय विराजमान असतात. मग जाणून घ्या गणेशोत्सवामधील या प्रत्येक सणांच्या तारखा आणि महत्त्व

हरितालिका व्रत

भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. यंदा हे व्रत 21 ऑगस्ट दिवशी आहे. मनाजोगा पती मिळावा म्हणून उपवर मुली हे व्रत करतात. पार्वतीने हे व्रत करून शंकराला प्राप्त केले. Hartalika Teej 2020: हरतालिका तृतीयेचंं व्रत कसं आणि कधी कराल, जाणुन घ्या मुहुर्त आणि पूजाविधी.

गणेश चतुर्थी

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. या दिवशी बाप्पा विराजमान होतात. त्यांची पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली जाते.

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी यंदा 23 ऑगस्ट दिवशी आहे. महिला हे व्रत करतात. ऋषी, साधू, संत यांच्या स्मृतीसाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी बैलांच्या मेहनती शिवाय पिकवलेल्या पदार्थांचे सेवन करून व्रत करायचे असते.

गौरी आवाहन

महाराष्ट्रात गणपतीसोबतच गौरीच्या आगमनाची देखील मोठी तयारी असते. यंदा 25 ऑगस्टला गौराईचं आगमन होणार आहे. राज्याच्या विविध भागात प्रांतानुसार गौराई आणण्याच्या वेगवेगळ्या रीती-भाती असतात.

गौरी पूजन

अनुराधा नक्षत्रात गौरी आणल्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन केले जाते. यंदा हा सोहळा 26 ऑगस्ट दिवशी रंगणार आहे. गौरी पूजनाला मुली माहेरी येतात. गौराईचं दर्शन घेतात. एकमेकींना ओवसं देतात.

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशी हे व्रत श्रीकृष्णाने युधिष्ठीराला दिले होते. त्याच्या प्रीत्यर्थ हे व्रत केले जाते. दरम्यान 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी केले जाते.

महाराष्ट्रात यंदा कोरोना व्हायरसचं सावट पाहता, गणेशोत्सव साधे पणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये मिरवणूक नसेल. ताम झाम नसेल. केवळ श्रद्धेने घरच्या घरी गणेशोत्सव साजरा करा आणि बाप्प्पाकडे सार्‍या विश्वावरील कोरोना व्हायरसचं संकट दूर व्हावं म्हणून प्रार्थना करा.