Ganesh Chaturthi 2019: प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा -हास थांबविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून गणेश चतुर्थी निमित्त 'इको फ्रेंडली गणपती (Eco Friendly Ganpati) आणि इको फ्रेंडली सजावट' (Eco Friendly Decoration) ही संकल्पना रूढ होत आहे. या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीकडे पर्यावरणाविषयी एक अनमोल संदेश या संकल्पनेतून पोहोचविला जात आहे. असे असले तरीही ही संकल्पना गेल्या 40 वर्षांपासून लोअर परेल (Lower Parel) मधील रुस्तम बिल्डिंग (Rustom Building) मधील रहिवासी जोपासत आले आहेत. या बिल्डिंगमधील बाप्पा गेल्या 20 वर्षांपासून भिंतीवर विराजमान होत आहे. या बिल्डिंगमधील पहिला बाप्पा हा काळ्या फलकावर विराजमान झाला होता. इतकेच नव्हे तर या इको फ्रेंडली बाप्पाचे विसर्जनही तितक्याच हटके अशा इको फ्रेंडली पद्धतीने केले जात आहे. काय आहे या मागची कहाणी, पाहूया
40 वर्षांपूर्वी लोअर परेल मधील रुस्तम बिल्डिंगमधील रहिवासी महादेव कांदळगावकर (Mahadev Kandalgaonkar) यांनी एका छोट्या काळ्या फलकावर बाप्पांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. त्यानंतर कालांतराने त्यांची ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी याच बिल्डिंगमधील सुधीर सावंत (Sudhir Sawant) यांनी पुढाकार घेतला. येथील रहिवाशांचा उत्साह आणि श्रद्धा पाहून सुधीर सावंत यांनी हा गणपती भिंतीवर साकारण्यास सुरुवात केली. पाहता पाहता कित्येक वर्षे लोटली. मात्र त्यांच्या या प्रथेत कोणताही खंड पडू न देता येथील रहिवाशांनीही त्यांना साथ दिली. त्यानंतर शैलेश वारंग याने चित्र रेखाटण्याचे काम काही वर्षे सुरु ठेवले आणि आता याच परंपरेला पुढे चालू ठेवत मागील 3 वर्षांपासून सुधीर सावंत यांचा मुलगा शार्दुल सावंत (Shardul Sawant) या गणरायाला भिंतीवर रेखाटण्याचे काम करत आहे. त्याच्या या संकल्पनेमुळे रुस्तम बिल्डिंगमधील हा बाप्पा 'निसर्गाचा राजा' म्हणून ओळखला जाऊ लागलाय. हेही वाचा- Ganeshotsav 2019: गणपतीला का वाहिल्या जातात दुर्वा? जाणून घ्या यामागची कथा
चित्रकलेची आवड असलेला 22 वर्षीय शार्दुल आपले शिक्षण सांभाळून गेल्या 3 वर्षांपासून आपल्या कलाकौशल्यातून हा निसर्गाचा राजा साकारत आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की निसर्गाचा राजा हे नाव का पडले असावे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे या इको फ्रेंडली बाप्पा प्रमाणे त्याचे विसर्जनही इको फ्रेंडली पद्धतीने केले जाते. यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी या गणपती पुढे अर्पण करण्यात आलेल्या नारळांतील पाणी या गणपती बाप्पाच्या चित्रावर शिंपडले जाते. त्यानंतर गणपतीजवळ असलेल्या कलशातील पाणी त्यावर सोडले जाते. गणपतीवर सोडलेले हे पाणी एका बादलीत जमा करून ते बिल्डिंगमधील असलेल्या कुंडयांमध्ये टाकले जाते. जेणे करुन हा बाप्पा कुंड्यातील रोपाद्वारे कायम सर्वांच्या आसपास राहतो अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. हेही वाचा- Ganesh Chaturthi Messages 2019: गणेश चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून देऊन यंदाचा गणेशोत्सव करा भक्तिमय वातावरणात साजरा
गेली 40 वर्षे 11 दिवस हा बाप्पा येथे विराजमान असतो. येथील रहिवासी मनोभावे या गणेशाची पूजा-अर्चा करतात. सामाजिक बांधिलकी जपत येथील रुस्तम बिल्डिंगमधील रहिवाशांचा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.