आपल्या लाडक्या गणरायाच्या (Ganesh Chaturthi) आगमनासाठी आणि त्याच्या पूजेत कुठलीही कमतरता राहू नये म्हणून सर्व गणेश भक्त अगदी जोरदार तयारी लागले आहेत. यात मोदकांइतकेच महत्त्वाच्या असतात त्या 'दुर्वा' (Durva). गणपतीच्या पूजेदरम्यान 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण केला जातो. यासाठी 3,5,7,9 अशी दुर्वांची जुडी बनवली जाते. गणपतीला दुर्वा वाहण्यामागे कारणही तितकेच खास आहे. गणपतीला दुर्वा फार प्रिय असल्यामुळे गणपतीला दुर्वा वाहण्यात येतात. यामुळे गणपती आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपली मनोकामन पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र आपल्यापैकी किती जणांना यामागचे खरे कारण माहित आहे.
आपल्यापैकी अनेकांना गणपतीला दुर्वाच का वाहिल्या जातात असा प्रश्न पडला असेल. तर त्यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी ला चंद्राला पाहणं का टाळतात? जाणून घ्या चंद्र दर्शन न करण्याची वेळ
त्याचबरोबर दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.